मुंबई : महायुतीमध्ये (Mahayut) अजूनही काही जागांवरील तिढा सुटलेला नाही. मात्र ज्या जागांवर योग्य तोडगा निघतोय, त्या-त्या जागांचे उमेदवार महायुतीकडून जाहीर केले जात आहेत. नुकतेच भाजपाने (BJP) आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण दोन जागांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत.
चौथ्या यादीत दोन जागांसाठी उमेदवारांची घोषणा
भाजपान चौथ्या यादीत एकूण दोन जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. उमरेड (अनुसूचित जाती) आमि मीरा भाईंदर या दोन जागांचा चौथ्या यादीत समावेश आहे. उमरेड या जागेसाठी भाजपाने सुधीर पारवे यांना तिकीट दिले आहे. तर मीरा भाईंदर या जागेसाठी भआजपान नरेंद्र मेहता यांना संधी दिली आहे.
उमरेड अखेर भाजपाकडेच
नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघाचा सस्पेन्सही संपला आहे. उमरेडमध्ये भाजपाचा उमेदवार राहील की शिंदेंच्या शिवसेनेचा असा प्रश्न गेले काही दिवसांपासून कायम होता. मात्र आज भाजपाने उमरेड विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार सुधीर पारवे यांना उमेदवारी देऊन उमरेडमध्ये भाजपाचाच उमेदवार राहील हे स्पष्ट केले आहे.
नागपुरात 11 पैकी 10 जागा भाजपाकडे
लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातून महायुतीने काँग्रेसचे उमरेडचे तत्कालीन आमदार राजू पारवे यांना शिवसेनेत घेत उमेदवारी दिली होती. मात्र राजू पारवे निवडणुकीत पराभूत झाले होते. तेव्हापासून ते उमरेडमधून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून इच्छुक होते. तर दुसऱ्या बाजूला भाजपाचे सुधीर पारवे या मतदारसंघातून इच्छुक होते. एकनाथ शिंदे यांनी उमरेड विधानसभा मतदारसंघासाठी खूप जोर लावला होता. मात्र अखेरीस उमरेडची जागा महायुतीच्या जागा वाटपात भाजपच्याच वाट्यात आली आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा क्षेत्रांपैकी रामटेक वगळता सर्व 11 मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आहेत.
मीरा भाईंदरमधून कोणाला तिकीट?
मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार गीता जैन या 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांनी नंतरच्या काळात शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मीरा-भाईंदरची जागा महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. गीता जैन आणि नरेंद्र मेहता या दोघांनीही सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मेहता यांच्या पारड्यात दान टाकले आहे.
हेही वाचा :
BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, कोणाकोणाला उमेदवारी?
BJP Candidate Vidhan Sabha : काय आहेत भाजपच्या पहिल्या यादीची वैशिष्ट्ये? अपक्ष लढलेल्यांना संधी?
BJP Candidate List : भाजपच्या पहिल्या यादीत विदर्भाल्या 23 मतदारसंघातले उमेदवार जाहीर