Praniti shinde on Bjp : लोकसभा निवडणुकीत (solapur loksabha) भाजपचा सोलापुरात दंगल घडवण्याचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप सोलापूर लोकसभेच्या नवनियुक्त खासदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांनी केलाय. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रणिती शिंदेंनी प्रथमच मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी भाजपवर गंभीर टीका केलीय. 400 पार चा नारा सुरु असताना इथल्या सर्वसामान्य लोकांनी मला हिंमत दिली, मला लढण्याची प्रेरणा दिल्याचे शिंदे म्हणाल्या. सोलापूरची (Solapur) पहिली महिला खासदार होण्याचा मान मला मिळाला, हे केवळ इथल्या जनतेमुळे शक्य झाल्याचे त्या म्हणाल्या.
लोकांचे ऋण मी कधीच विसरु शकणार नाही
प्रचाराच्यावेळी 43 डिग्री तापमान होतं. मात्र, लोकं विशेषतः शेतकऱ्यांनी बाहेर येऊन आपला भाजप विरोधात असलेला रोष व्यक्त केला. 400 पार चा नारा सुरु असताना इथल्या सर्वसामान्य लोकांनी मला हिंमत दिली. मला लढण्याची प्रेरणा दिल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या. सोलापूरकरांच्या अनेक आशा माझ्याकडून आहेत. अनेक आव्हानं आता माझ्यासमोर असणार आहेत. तीन वेळा आमदार आणि आता खासदार झाले आहे. लोकांचे ऋण मी कधीच विसरु शकणार नाही असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. ज्यांनी मतदान केलं आणि ज्यांनी नाही केलं अशा सर्वांसाठीच काम करणं हेच माझे ध्येय असल्याचे त्या म्हणाल्या.
देशात सत्ताधारी पक्ष इतक्या खालच्या पातळीवर कसा येऊ शकतो?
भाजपाकडे मुद्दा नव्हता, पहिल्या दिवसापासून आम्ही ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न केला. ध्रुवीकरण आणि लोकांमध्ये भांडण लावणे हा एकच अजेंडा भाजपच्या समोर होता असे त्या म्हणाल्या. सोलापुरात दंगल घडवणं हा त्यांचा अजेंडा होता. मला माहिती होती की शेवटी शेवटी त्यांचा प्रयत्न सोलापूर भडकवण्याचे असतील. इतक्या खालच्या लेव्हलवर जाऊन भाजपने काम केलं. मला किळस येते, वाईट वाटते आपल्या देशात सत्ताधारी पक्ष इतक्या खालच्या पातळीवर कसा येऊ शकतो? असा सवाल करत प्रणिती शिंदेंनी भाजपवर जोरदार टीका केली.
देशाची एकता तोडण्याचा प्रयत्न भाजपने केला
देशाची एकता तोडण्याचा प्रयत्न करण्याचं पाप भाजपने केलं आहे. मी निवडणुकीत हे बोलू शकले नाही. पण खरंच वाईट वाटते की कीड लावण्याचा प्रयत्न यांनी केला. सोलापुरात देखील त्यांना हेच करण्याच्या सूचना होत्या. मतदान सुरु असताना मुद्दाम येऊन नारेबाजी केली, पोलिसांनी देखील मला फोन करुन हे कळवलं होतं असे शिंदे म्हणाल्या. त्यांना प्रशासनाने ताकीद दिली की तुम्ही येथून निघा अन्यथा सोलापूरचं काही बरं वाईट झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही असेही त्या म्हणाल्या. भाजपाच्या लोकांना आणि उमेदवाराला सूचना होत्या की सोलापुरात दंगल घडवा, जातीय तेढ निर्माण करा असे त्या म्हणाल्या.
बदला घेणे ही माझी संस्कृती नाही
लोकांनी शांतीत क्रांती केली आहे. लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. मागील दोन निकालामध्ये झालेला पराभव हा लोकांनी दिलेला कौल होता. बदला घेणे ही माझी संस्कृती नाही असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. पहिल्या निवडणुकीत लाट होती. दुसऱ्यांदा धार्मिक करुन निवडणुकीत पराभव केला होता. मात्र, आता लोकांनी त्यांना जागा दाखवली, काल निकालनंतर पाऊस आला मला कोणीतरी म्हणाले सोलापूर आता साफ झाले असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. महाराष्ट्रमध्ये काँग्रेसला लोकांनी अप्रितम प्रतिसाद दिला, देशभरातही लोकांनी प्रतिसाद दिला आहे असं त्या म्हणाल्या.
भारत जोडो यात्रेचा परिणाम झाला
एक छुपा रोष भाजप विरोधात होता. भाजपच्या धमक्यामुळं लोकं बोलत नव्हते, पण त्यांनी मतपेटीमधून ते दाखवून दिलं. कारखाना, हॉस्पिटल, उद्योग धंद्यातील लोकांना धमक्या दिल्या. काम नाही केलं तर छापे टाकू, मात्र लोकांनी शांततेत काम केल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या. केंद्रीय पातळीवर भारत जोडो यात्रेचा परिणाम झाला. राहुल गांधींच्या मेहनतीचा परिणाम हे 13 जागा आहेत असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. लोकांचा कल पूर्णपणे इंडिया आघाडीकडे होता, त्यांच्या दमदाटीमुळे काही जागा वाढल्या असतील, पण लोकांना बदल निश्चित हवा आहे. इंडिया आघाडीला थोड्या कमी जागा मिळाल्या तरी जिंकलोय. त्यांना जास्त जागा मिळूनही त्यांचा पराभव झाला आहे. मोदी फक्त एक लाख आघाडीने निवडून येतात हे लाजिरवाणी गोष्ट असल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या. सोलापूरकरांचे मनापासून आभार, हा विजय तुम्हाला अर्पण करते. पाणी, रस्ते, आयटीपार्क हे सगळे मुद्दे माझ्यासमोर असतील असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या: