Bharat Gogawale: विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर केलं. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला किंवा नेत्यांना सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी टोला लगावला आहे. लोकसभेत आम्ही सुनील तटकरे यांचं प्रामाणिक काम केलं. मात्र, भरत गोगावले यांना मतदान करण्याच्या वेळी जर का कोणी पक्षांतर करत असतील  त्याची ही आम्ही काळजी आम्ही करत नाही, असं ते म्हणालेत. तर या वाक्याचं उदाहरण देताना त्यांनी 'छञपती शिवाजी महाराजांसोबत लाखो सैन्य नव्हतं, तरी देखील जे मूठभर मावळे होते. पण ते जीवाला जिव देणारे होते' असं म्हटलं आहे. 


नेमकं काय म्हणालेत भरत गोगावले?


सुनील तटकरे यांचं काम करायचं होतं, त्यावेळी आम्ही चोखपणे काम केलं. तटकरे यांना मतदान करायचा आहे, म्हणून आमचे कार्यकर्ते कुठे हलले नाहीत. पण भरत गोगावले यांना मतदान करायचा आहे, म्हणून काही लोक जात असतील तर त्याची काळजी आम्ही करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांकडे लाखो सैन्य नव्हतं, पण जे मावळे होते ते जीवाला जीव देणारे होते, जसे हे सगळे माझे मावळे आहेत, काही आज आमच्या बरोबर नसले तरी कळत नकळत निवडणुकीच्या दिवशी तिथे गेल्यानंतर भरत गोगावले नाव दिसल्यानंतर निशाणी दिसल्यानंतर ते मलाच मतदान करणार आहेत. त्याची काही कारण आहेत. आम्ही आत्तापर्यंत कोणालाही दुखावलेलं नाही. देणारा वरती बसलेला आहे, आपण मात्र आपण निमित्त आहोत, असं यावेळी भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.


भरत गोगावले यांनी ऐन निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना टोला लगावला आहे. त्याचबरोबर त्यांनी यावेळी विरोधकांवर देखील टीका केली आहे. संविधान बदलणार या फेक नरेटिव्ह पसरविणाऱ्या विरोधकांच्या वक्तव्यावर गोगावले यांचा प्रचार सभेतून विरोधकांना टोला लगावला आहे. ज्या न्यायदेवतेच्या हातात संविधान दिलं आहे. तो देश कधीही संविधान बदलू शकत नाही, असं मोठं विधान भरत गोगावले यांनी प्रचार सभेत केलं आहे. त्याचबरोबर आमच्या लोकांना विरोधकांकडून फसवण्याचं काम सुरू आहे. आरपीआय पक्षाचा एकही खासदार आमदार नसताना देशाच्या मंत्रिमंडळात रामदास आठवले यांना मंत्री पदाच स्थान देणारे हे सरकार आहे असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.


मशिदींवरील भोंगे उतरविण्याच्या राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर भरत गोगावले यांनी मोठं विधान केलं आहे. राज ठाकरे यांचं गेली चार वर्षे हे वक्तव्य सुरू आहे. माञ आमच्या सरकारने हे भोंगे उतरवू दिले का? नितेश राणे यांनी देखील वक्तव्य केलेलं, मात्र ते सुध्दा सत्तेत असून भोंगे उतरवू का शकले नाहीत. भोंगे उतरवायचे असते तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच होते, मग का नाही उतरवू शकले तेव्हाच ते उतरवू शकले असते म्हणून, चुकीच्या गोष्टींवर कोणी विश्वास ठेऊ नका, आमच्याकडे आता मुस्लीम बांधव आकर्षित व्हायला लागलेत असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.