Punjab Assembly Elections 2022 Results : पंजाब विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाच्या त्सुनामीपुढे सर्वांची दयनीय अवस्था झाली. 117 जागांपैकी आप पक्षाने 92 जागांवर विजय नोंदवला. आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलेले भगवंत मान लवकरच शपथ घेणार आहेत. भगवत मान यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. पंजाब निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला. यामध्ये पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांचाही समावेश आहे. पंजाब विधानसभा निकालानंतर भगवंत मान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ भगवत मान राजकारणात सक्रीय होण्यापूर्वीचा आहे. 


भगवंत मान "द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज" या स्पर्धेत विनोदवीर म्हणून स्पर्धक होते. त्याच स्पर्धेत नवजोतसिंग सिद्धू पंच होते. आता भगवंत खासदारकी सोडून पंजाबचे मुख्यमंत्री होतील आणि सिद्धू राज्याचे सत्ताधारी पक्षाचे पक्षप्रमुख असताना आमदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.  व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत भगवंत मान द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या स्टेजवर परफॉर्म करत आहेत. यामध्ये भगवंत मान यांनी राजकाराचा अर्थ सांगितला आहे. भगवत मान यांच्या या विनोदावर सिद्धू यांनाही हसू आवरले नव्हते. 


पाहा व्हिडिओ.... 







"द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज" भगवंत मान यांच्या विनोदावर सिद्धू हसत होते. आज सिद्धू यांच्या नशीबावर नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणाऱ्या सिद्धूला आपली आमदारकीही वाचवता आली नाही, तर भगवंत मान मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, असे काही नेटकरी म्हणत आहेत. काहींच्या मते सिद्धूंनी राजकारणातून सन्यास घ्यावा..