Beed Lok Sabha Election 2024: बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) विरुद्ध भाजप आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये बजरंग सोनावणे यांचा 6 हजार मतांनी विजय झाला. शरद पवार यांच्या गटाने राज्यात एकूण 10 जागा लढवल्या होत्या. यातून 8 जागांवर शरद पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला. आज सुप्रिया सुळे आणि निलेश लंके वगळता इतर सर्व खासदारांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी बजरंग सोनावणे यांचा जायंट किलर म्हणून उल्लेख केला.
मी निवडून आलोच- बजरंग सोनावणे
बजरंग सोनावणे 'एबीपी माझा'शी संवाद साधताना म्हणाले की, देशात मोदींची गॅरंटी चालली नाही, मग बीडमध्ये काय चालणार? बीड जिल्हा हा याआधीही शरद पवार यांच्यासोबत होता, आजही आहे हे सिद्ध झालंय. हा कुणाचाही गड नाही. पिपाणीने आमचा घात केला नाहीतर 50 ते 60 हजारांच्या मतांनी निवडून आलो असतो. अजित पवार म्हणाले होते, उभं राहू नको. पण आता काय बोलणार मी निवडून आलो, असं बजरंग सोनावणे म्हणाले. तसेच आगामी काळात बीडमधून सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे निवडणून आणणार असंही बजरंग सोनावणे यांनी सांगितले.
बीडमधील निवडणुकीत मोठी रंगत-
शरद पवारांनी ऐनवेळी बजरंग सोनवणेंना उमेदवारी देऊन बीडमधील निवडणुकीत मोठी रंगत वाढवली. बीड हे मराठा आरक्षणाचं केंद्रस्थान बनलं असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकांचं माहेरघरही बीड जिल्हा झाला आहे. त्यामुळे, बीडच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर, बजरंग सोनवणेंना मराठा आरक्षण आंदोलनाचा व मनोज जरांगेंचा फायदा झाला. त्यामुळे, सोनवणे 6 हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर, त्यांनी रात्री उशिराच मनोज जरांगेंची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. तुमच्यामुळेच मी निवडून आलो, असेही त्यांनी म्हटले.
अजित पवार काय म्हणाले होते?
पंकजाताईच्या विरोधात बजरंग उभा आहे तो सारखा माझ्याकडे यायचा. माझ्या कारखान्याची कॅपसिटी वाढवून द्या, अशी मागणी करायचा. मी देत नव्हतो पण धनंजय मुंडेंनी वाढवून द्यायला सांगितली. मी धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की वेसन हातात ठेवायला पाहिजे होते. धनुभाऊ कधी माणसं कळत नाही, म्हणून त्याची गाडी बिघडते. तू माझा सल्ला घेत जा . तू स्वत:ला हनुमान समजायला लागला.. बजरंग सोनावणेचा बार्शी आणि बीडमध्ये कारखाना आहे. सगळ बर चालले होते, त्याला काय अवदसा आठवली काय माहिती आणि निवडणुकीला उभा राहिला. परंतु काहींना दोन पैसे हाती आले की मस्ती येते असे मस्ती त्याला आली.
माझ्याबरोबर राहिला आणि मला आता सोडलं- अजित पवार
इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि मला आता सोडले. मी एवढं सगळं देऊन तो मला सोडून जाऊ शकतो तर तो तुम्हाला किती वेळा सोडू शकतो. अरे हा पट्ठ्या स्वत: खासदारकीला पडला. स्वतःच्या मुलीला ग्रामपंचायत सदस्य करू शकला नाही. स्वतःच्या मुलीला ग्रामपंचायत, नगरपालिकेला निवडून आणू शकला नाही तो खासदार बनायला निघाला, असेही अजित पवार म्हणाले.
आणखी वाचा
जिल्हाधिकाऱ्यांनी 1500 पोस्टल मतदान मोजलंच नाही; पंकजा मुंडेंनी सांगितलं मतमोजणीवेळी रात्री काय घडलं