Baramati Exit Poll Result 2024 Lok Sabha Election : देशातील नव्हे, तर राज्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये कोण विजयी होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टीव्ही नाईन एक्झिट पोलमध्ये बारामतीमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचे चिन्ह आहे. त्यामुळे सर्वाधिक हाय व्होल्टेज आणि सर्वाधिक ताकद लावलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्येच अजित पवारांना झटका बसणार का? याची सुद्धा चर्चा रंगली आहे. अजित पवारांनी बारामतीमध्ये होणारा सर्व विरोध शांत करत सुनेत्रा पवारांना रिंगणात उतरवले होते. सत्ताच कशी महत्वाची आहे, हे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. भावनिक पातळीवर बारामतीमध्ये सर्वाधिक प्रचार केला होता. 






बारामतीमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजयी होणारच असा दावा सातत्याने अजित पवार गटाकडून करण्यात आला होता. महायुतीमधील नेत्यांकडून सुद्धा करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी बारामतीमध्ये पूर्ण ताकद पणाला लावली होती. पत्नी सुनेत्रा पवारच रिंगणात असल्याने अजित पवारांनी अगदी सोसायटीपर्यंत जाऊन प्रचार केला होता. मात्र, अजित पवारांना बारामतीकरांनी साथ न देता शरद पवारांना साथ दिल्याची चर्चा आहे. 






बारामतीचा सामना हा शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच रंगला होता. मात्र महायुतीच्या नेत्यांनी राहुल गांधी विरुद्ध मोदी असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बारामतीची लढाई शरद पवारांनीच एक्झिट पोलमध्ये तरी जिंकल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर कुटुंब सुद्धा फुटले गेले होते. अजित पवार एका बाजूला आणि पवार कुटुंबीय दुसऱ्या असेच चित्र होते. त्यामुळे लढत कोण जिंकणार याची उत्सुकता होती. मात्र एक्झिट पोलच्या अंदाजामध्ये तरी सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. अंतिम निकाल हा चार जून रोजी येणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या