पालघर : लोकसभा निवडणुकीचे सनई चौघडे वाजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये सध्या जोरदार आघाडी आणि युतीच्या मोर्चेबांधण्या सुरु आहेत. सत्तेत एकत्र नांदूनही एकमेकांवर बोचरी टीका करणाऱ्या शिवसेना-भाजपाने युतीचा निर्णय घेतला आहे. पण सत्तेत सोबत असलेल्या बहुजन विकास आघाडीला वाऱ्यावर सोडले. त्यामुळे बविआ पुन्हा एकदा आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवून नशीब आजमावणार आहे. शिवाय आघाडीकडूनही पालघर लोकसभेची जागा बविआसाठी सोडून मित्रत्वाचा हात पुढे करण्याची शक्यता आहे. पण आतापर्यंत घडामोडींचा वेध घेतल्यास युतीच्या लफड्यात वसईतील स्थानिक पक्ष बहुजन विकास आघाडीची मात्र घुसमट होत असल्याचे समोर येत आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांनावर जोरदार टीका करत उणेंधुणे काढले होते. पण यावेळी जागा वाटपाचा भाजपा-शिवसेनेत समझोता होऊन लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनोमिलन झाले आहे. लोकसभेच्या 25 जागा भाजप आणि 23 जागांवर शिवसेना या फॉर्म्युल्यावर दिलजमाईने तडजोड झाली आहे. या सर्व युतीच्या भानगडीत सध्या सत्तेत सोबत असलेल्या बहुजन विकास आघाडीला मात्र वेटिंगवर ठेवण्यात आले. त्यातच पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडल्याचे समजते. त्यामुळे बविआचा अपेक्षाभंग झाला आहे. पोटनिवडणुकीतही भाजपाने बविआचा भावनाविवश करत उमेदवार उभा केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वसईत येऊन बविआ वर जहरी टीका केली होती. तसेच हक्काच्या उत्तर भारतीय मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांना प्रचाराच्या मैदानात उतरवून बविआची कोंडी केली होती. सत्तेत एकत्र नांदत असतानाही बविआला अशा प्रकारच्या वागणुकीला समोरे जावे लागले. त्यातच आता नाराज शिवसेनेला खूश करण्यासाठी पालघरची जागाही बहाल करत बविआला बाजूला ठेवले आहे.
आता युतीचा निर्णय झाल्याने बविआलाही आपली मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. आघाडीनेही बविआसाठी पालघर मतदारसंघ सोडला असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून समजते. राजेंद्र गावित भाजपात गेल्याने आघाडीकडेही सध्या तुल्यबळ उमेदवार नाही. दुसरीकडे पोटनिवडणुकीत दुसऱ्या स्थानी राहिलेले तसेच अनुभवी माजी खासदार बळीराजा जाधव हे बविआकडे पर्यायी उमेदवार आहेत. त्यामुळे बविआला पालघर मतदार संघ सोडण्याबाबत विचार आघाडीमध्ये सुरु आहे. वसईत बविआचा मतदारांवर प्रभावही आहे.
सध्या बविआच्या ताब्यात वसई विरार महापालिका आहे. तसेच जिल्ह्यातील तीन मतदार संघात तीन आमदार आहेत. वसई पंचायत समितीही बविआकडे आहे. वास्तविक बविआचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेल्या वीस वर्षांचे मित्रत्व आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्तांतरानंतर बविआने भाजपाशी जुळवून घेत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. परंतु भाजपाशी जुळवून घेताना हितेंद्र ठाकूर यांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यातच युतीचा निर्णय झाल्याने हितेंद्र ठाकूर यांना स्वतंत्रपणे लढण्याची मोकळीक मिळाली आहे. शिवसेना-भाजपा-बविआ अशी युती होणे अशक्य आहे. शिवाय भाजपाला हितेंद्र ठाकूर यांना रोखूनही धरता येणार नाही. तसेच युती झाल्याने बविआचीही चिंता वाढली असली तरी युतीलाही गाफील राहता येणार नाही. त्यामुळे यावेळीही पालघर मतदारसंघात तुल्यबळ लढतीची अपेक्षा आहे. मात्र पालघर लोकसभा मतदारसंघातील सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये युतीची घोषणा झाल्यावरही मोठ्या प्रमाणात ताटातूट आहे. त्यामुळे ह्याचा फायदा आघाडी प्रणित बहुजन विकास आघाडीला होऊ शकते यात शंका नाही. परिणामी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी स्थिती पालघर लोकसभा मतदारसंघात निर्माण झाली आहे.
युतीच्या लफड्यात बहुजन विकास आघाडीची मात्र घुसमट, आघाडीकडून मित्रत्त्वाचा हात?
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर
Updated at:
21 Feb 2019 07:27 AM (IST)
सत्तेत एकत्र नांदत असतानाही बविआला अशा प्रकारच्या वागणुकीला समोरे जावे लागले. त्यातच आता नाराज शिवसेनेला खूश करण्यासाठी पालघरची जागाही बहाल करत बविआला बाजूला ठेवले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -