देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेला बागलाण म्हणजे आजचा सटाणा मतदारसंघ. या मतदारसंघात आलटून पालटून दोन परिवारातच आजपर्यंत निवडणुका झाल्याच चित्र पहावयास मिळाले. मात्र यंदा उमेदवाराची संधी नवीन मतदाराला मिळणार का याच्याच चर्चा होऊ लागल्या आहेत.
बागलाण मतदार संघ हा चाळीस वर्षापूर्वी अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आणि त्यानंतर या मतदार संघात बोरसे आणि चव्हाण या दोन कुटुंबातील सदस्यांमधील उमेदवार निवडणुकीत विजयी होत आले.
1995 साली माजी आमदार दिलीप बोरसे यांनी अपक्ष उमेदवारी करत निवडणूक लढवली आणि विजयश्री खेचून आणली. त्यानंतर माजी आमदार संजय चव्हाण यांनीही अपक्ष मग राष्ट्रवादी असा प्रवास करत आमदारकी मिळवली. तर माजी आमदार दिलीप बोरसे यांचे बंधू उमाजी बोरसे यांनी भाजपाकडून उमेदवारी करत विजय मिळविला. असे एका मागे एक याच दोन परिवारात खऱ्या अर्थाने इथली आमदारकी फिरत राहिली.
2014 सालच्या निवडणुकीत माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पत्नी दिपीका चव्हाण या राष्ट्रवादीकडून विजयी झाल्या तर भाजपच्या उमाजी बोरसे यांचा पराभव झाला. मोदी लाटेचा प्रभाव असतांना बागलाणमध्ये दिपीका चव्हाण यांनी आपला गढ राखला. यापूर्वी नगरपरिषद, पंचायत समिती, बाजार समिती मध्ये संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र राष्ट्रवादीची सत्ता होती.
बागलाण मतदार संघ हा धुळे लोकसभा मतदार संघात मोडत असल्याने मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाला भरभरुन मतदान झाले होते. नगरपरिषद, पंचायत समितीमध्ये भाजपचा बोलबाला सुरु झाला आणि राष्ट्रवादीची काहीशी पिछेहाट झाली. त्यातच खासदार सुभाष भामरे यांनी बागलाण तालुक्यात सुरु केलेली सिंचनाची काम आणि विकासकामांमुळे आमदार दिपीका चव्हाण यांच्यासाठी आव्हान ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच सटाणा शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून पुनंद धरणातून थेट पाईपलाईनने पाण्याचा प्रश्न सुटणार असून त्याचे काम प्रगती पथावर सुरु आहे. साहजिकच त्याचा परिणाम यंदाच्या निवडणुकीत उमटणार आहे.
चव्हाण आणि बोरसे या दोन कुटुंबातील सदस्यांमध्येच आज पर्यंत निवडणुका होत असल्या तरी यंदा मात्र अनेक नवीन चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले असून त्यापार्श्वभूमीवर त्यांचे मतदार संघात दौरे सुरु झाले आहेत.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान
दिपीका चव्हाण-राष्ट्रवादी-68,434
दिलीप बोरसे-भाजपा-64,253
साधना गवळी-शिवसेना-9108
जयश्री बर्डे-कॉंग्रेस-6946
बागलाण तालुक्यात सर्वात मोठा प्रश्न अपूरे सिंचन प्रकल्प. विंचूर-प्रकाशा महामार्गाचा शहराबाहेरुन जाणारा बाह्यवळण रस्ता अशा काही महत्वाच्या समस्या आहेत. याच बरोबर महत्वाचा प्रश्न म्हणजे रोजगार निर्मितीसाठी औद्योगिकरणाचा अभाव हे प्रश्न प्रलंबित आहे. एकूणच बागलाण मतदारसंघाचा विचार करता दोन पारंपारिक कुटुंबात होणाऱ्या निवडणुकीत यंदा मतदार नवख्या उमेदवाराला निवडणार की पुन्हा या दोन्ही कुटुंबापैकी कुणा एकाला हे निवडणुकीनंतर दिसेल.
बागलाण विधानसभा मतदारसंघ | बोरसे आणि चव्हाण या कुटुंबांभोवती फिरतंय तालुक्याचं राजकारण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Aug 2019 02:44 PM (IST)
बागलाण मतदारसंघाचा विचार करता दोन पारंपारिक कुटुंबात होणाऱ्या निवडणुकीत यंदा मतदार नवख्या उमेदवाराला निवडणार की पुन्हा या दोन्ही कुटुंबापैकी कुणा एकाला हे निवडणुकीनंतर दिसेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -