Assembly Election Results 2023 : मध्य प्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड (Chhatisgarh), राजस्थान (Rajsathan) आणि तेलंगणा (Telangana) या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी समोर आले. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे, तर तेलंगणात काँग्रेसने भारत राष्ट्र समितीचा (BRS) पराभव करून सत्ता काबीज करण्यात यश मिळवलं आहे. आता या चार राज्यांना नवे मुख्यमंत्री मिळतील. चारही राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होईल आणि त्यानंतर शपथविधी सोहळा आयोजित केला जाईल. भाजपने मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajsathan) आणि छत्तीसगडमध्ये (Chhatisgarh) चमकदार कामगिरी करत तिन्ही राज्यांमध्ये बहुमत मिळवलं आहे. भाजपच्या या शानदार विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, या हॅट्ट्रिकने 2024 ची हॅट्ट्रिक निश्चित केली आहे. 


विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत


या निकालांमध्ये भाजपची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे. जर आपण मध्य प्रदेशबद्दल बोललो तर येथे भाजपने 230 पैकी 163 जागा जिंकल्या आहेत. येथे काँग्रेसने 66 जागा जिंकल्या आहेत, तर भारतीय आदिवासी पक्षाने एक जागा जिंकली आहे. छत्तीसगडमधील 90 जागांपैकी भाजपने 54 जागा जिंकल्या आहेत, काँग्रेसने 35 जागा जिंकल्या आहेत, तर 1 जागा जीजीपीच्या खात्यात गेली आहे. 


राजस्थान आणि तेलंगणाचा निकाल


राजस्थानमध्ये विधानसभेच्या 199 जागांवर निवडणूक झाली. यापैकी भाजपने 115, काँग्रेसने 69 जागा जिंकल्या आहेत, तर भारतीय आदिवासी पक्षाने 3, बसपा 2, आरएलडी 1 जागा जिंकल्या आहेत. आठ अपक्ष उमेदवारही विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. काँग्रेस तेलंगणात सरकार स्थापन करणार आहे. येथील एकूण 119 जागांपैकी काँग्रेसने 64 जागा जिंकल्या आहेत. हा आकडा बहुमतापेक्षा जास्त आहे. तेलंगणा राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 60 जागांची आवश्यकता असते.


मिझोराममध्ये आज मतमोजणी


दरम्यान, आज मिझोराममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणीही होत आहे. मिझोराम विधानसभेसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होतं. इतर चार राज्यांसह मिझोरामची मतमोजणीही 3 डिसेंबरला होणार होती मात्र, त्यानंतर मतमोजणी पुढे ढकलण्यात आली. आज मिझोराम विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मिझोराममध्ये कुणाचं सरकार स्थापन होणार हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत 18 महिलांसह एकूण 174 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील 8.57 लाख मतदारांपैकी 80 टक्क्यांहून अधिक मतदारांनी कुणावर विश्वास दाखवला हे लवकरच कळेल. मिझोरममध्ये, MNF, ZPM आणि काँग्रेसने प्रत्येकी 40 जागा लढवल्या, तर भाजपने 13 जागांवर निवडणूक लढवली आहे.