Rajasthan Election Result 2023 : मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) संध्याकाळी 5.30 वाजता राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनात पोहोचतील आणि त्यांचा राजीनामा सादर करतील. राजस्थानमध्ये भाजप विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहे. ट्रेंडमध्ये भाजप काँग्रेसपेक्षा खूप पुढे असून त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. अशा स्थितीत सध्याचे काँग्रेसचे सरकार जाणार हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री अशोक गहलोत राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतील आणि त्यांना राजीनामा सुपूर्द करतील.


एकीकडे निकालाचे कल पाहून काँग्रेसच्या गोटात निराशा आहे, तर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जयपूरमध्ये भाजप कार्यकर्ते ढोल वाजवून आनंद साजरा करताना आणि एकमेकांना मिठाई खाऊ घालताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे 10 पैकी सहा एक्झिट पोलने राजस्थानमध्ये भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता. त्याचवेळी, एक्झिट पोलच्या अंदाजाच्या विरोधात, शनिवारी संध्याकाळी सीएम गहलोत यांनी काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा दावा केला होता. परंतु, आज सकाळपासून मतमोजणी सुरू होताच निकाल वेगळे दिसले आणि काँग्रेस पिछाडीवर पडली. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे, आजच मुख्यमंत्री अशोक गहलोत राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेऊन आपला राजीनामा देणार आहे. 


2018 च्या तुलनेत काँग्रेसच्या जागा कमी झाल्या


आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार काँग्रेस राजस्थानमध्ये बहुमताच्या तुलनेत खूपच मागे आहे. येथे बहुमतासाठी 101 जागा आवश्यक आहेत, परंतु ट्रेंडनुसार, कॉंग्रेसला सध्या 69 जागा मिळत आहेत, जे 2018 च्या निवडणुकीपेक्षा खूपच कमी आहे. दुसरीकडे, भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरू असून, 115 जागांवर भाजप आघाडीवर आहे.


राजस्थानमधील प्रथा कायम 


राजस्थानमध्ये पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीची प्रथा कायम असल्याचे चित्र आहे. पाच वर्षांनी पुन्हा सरकार बदलणार आहे. ट्रेंडमध्ये भाजप आघाडीवर आहे, तर अनेक जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांनी देखील अनेक जागा जिंकल्या असून, सत्ता मात्र भाजपची येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. 


अशोक गहलोत यांच्याच जवळच्या मित्राने काँग्रेसच्या पराभवावरून केला आरोप  


राजस्थान विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होत असून ट्रेंडमध्ये भाजपने काँग्रेसला मागे टाकले आहे. त्यामुळे, काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांमध्ये निराशा दिसून येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या जवळचे म्हटल्या जाणार्‍या ओएसडी लोकेश शर्मा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करत गहलोत यांच्यावरच निशाणा साधला आहे.  'जहां पुराने पत्ते नहीं झड़ते... वहां वसंत नहीं आता' अशी पोस्ट शर्मा यांनी केली आहे. लोकेश शर्मा यांच्या पोस्टमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. आता मुख्यमंत्री अशोक गहलोत हे लोकेश शर्मा यांना म्हातारे दिसू लागले आहेत, असा आशय काढला जात आहे. 'अशा स्थितीत जुनी पाने झडणे' आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


ना भाजप, ना काँग्रेस, या पक्षाला विधानसभा निवडणुकीत मिळाला पहिला विजय; गेल्या विधानसभा निवडणुकीत ठरला होता सर्वात तरुण आमदार