Mumbai Mahapalika Election 2022 : संपुर्ण देशाचं लक्ष लागलेलं शहर म्हणजे मुंबई (Mumbai) शहर. या मुंबई शहरात आगामी काळात महापालिकेची निवडणूक आहे. महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षाला आपली ताकद पणाला लावतो. त्यात शिवसेना (Shiv Sena), भाजप (BJP), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि मनसे (MNS) यांच्यात संघर्ष सुरू असताना मुंबईकरांना नवा पर्याय देण्याच्या जोरदार हालचाली आम आदमी पक्षानं सुरू केल्या आहेत. दिल्ली (Delhi), पंजाबमध्ये सत्ता काबिज केल्यानंतर मुंबईत पक्षाचा विस्तार करून मुंबई महापालिका (Mumbai Mahapalika Election) जिंकण्यासाठी 'आप'नं डाव आखला आहे.
दिल्ली पंजाब याठिकाणी आपनं करिष्मा दाखवत सत्ता स्थापन केली. मात्र काही राज्यात आपला अपयश आलं. गेल्या 2019 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत आप स्वबळावर लढला होता. मात्र त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. आता होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांवर कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप करू लागले आहेत. हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तसेच राष्ट्रवादी मनसे काँग्रेस आणि इतर पक्ष देखील आपल्या राजकारणात व्यस्त असताना अशा राजकीय गदारोळात आपनं आपली स्पेस निर्माण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
आप मुंबईकरांच्या समस्यांकडे लक्ष देणार : आपचे महाराष्ट्र सचिव
आपचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, "गेल्या दोन सव्वा दोन वर्षांपासून मुंबई महापालिकेची तयारी आम्ही करत आहोत. पंजाबमधील विजया मागचे रहस्य म्हणजे दिल्लीत केलेलं काम.पाणी, वीज आरोग्य शिक्षण, सुरक्षित प्रशासन, महिला सबलीकरण या विषयावर लक्ष देऊन आम्हाला दिल्ली पंजाबमध्ये लोकांनी निवडणून दिलं. मुंबईतही अनेक प्रश्न आहेत,रुग्णालय अवस्था बिकट, सार्वजनिक वाहतूकीची समस्या ,पावसाळ्यात मुंबईची स्थिती खराब असते त्यामुळे आम्ही दिल्ली आणि पंजाबच्या विकासाचे पॅटर्न मुंबईत राबवतोय.जनतेची कामे करण्याचा प्रयत्न आप प्रामाणिकपणे करतेय त्यामुळे मुंबईत आम्हाला यश मिळेल."
शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष गेली 25 वर्ष सत्तेत एकत्र होते. 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर युती तुटली. युती तुटल्यानंतर दोन्ही राजकीय पक्षांनी एकमेकांवर कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप सुरू केले आहेत, तसेच सत्ता मिळवण्यासाठी विविध प्रयत्न ते करतायत मात्र मूळ विकासाच्या मुद्द्यावर आणि समस्यांवर ते बोलत नाहीत. त्यामुळे मुंबईकर जनतेच्या अनेक समस्या आणि मुंबईचा विकास याकडे आपने लक्ष घातले आहे. आणि त्याप्रकारे निवडणुकीची तयारी त्यांनी सुरू केली. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आप मुसंडी मारते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.