Andheri West Vidhan Sabha constituency: लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना अवघ्या 221 मतांची आघाडी मिळवून देणाऱ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील यंदाची लढाई चुरशीची होण्याची शक्यता आहे. अंधेरी पश्चिम मतदारसंघ (Andheri West Vidhan Sabha) अस्तित्त्वात आल्यानंतर 2009 मध्ये याठिकाणी पहिल्यांदा निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसच्या अशोक जाधव (Ashok Jadhav) यांनी अंधेरी पश्चिममध्ये विजय मिळवला. मात्र, 2014 च्या मोदी लाटेत भाजपच्या अमित साटम (Amit Satam) यांनी अशोक जाधव यांचे वर्चस्व मोडून काढत याठिकाणी विजय मिळवला होता. 2019 मध्येही अमित साटम यांनी अंधेरी पश्चिममध्ये विजयाची पुनरावृत्ती केली होती. मात्र, यंदाची विधानसभा निवडणूक अमित साटम यांच्यासाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.


अंधेरी पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसने प्रथम सचिन सावंत यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी नकार दिल्याने काँग्रेसने येथून पुन्हा अशोक जाधव यांनाच रिंगणात उतरवले. लोकसभेच्या निकालानंतर अंधेरी पश्चिममधील जनमताचा कौल पाहता अशोक जाधव यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, अमित साटम यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये हा मतदारसंघ बांधला आहे. त्यामुळे अशोक जाधव यांना स्थानिक मतदार कितपत साथ देतात, हे पाहावे लागेल. त्यामुळे आता 23 नोव्हेंबरला काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.