मुंबई : मुंबईच्या दादर येथील शिवसेना भवनात अमित ठाकरे पहिल्यांदा दाखल झाले. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीतील मुद्यांबाबत मार्गदर्शन केलं. अमित ठाकरे यांनी शिवसेना भवनातील कार्यक्रमाबाबत एक पोस्ट केली आहे.
अमित ठाकरेंची पोस्ट
हा शब्द ठाकरेंचा…!
आज आदित्यने आणि मी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांशी संवाद साधला. ही फक्त निवडणुकीची तयारी नव्हती, तर मुंबईकरांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही जो आराखडा तयार केला आहे, त्याचं सादरीकरण होतं.
मुंबईच्या माणसाला मुंबईतच 'हक्काचं घर' मिळावं, रोजगाराच्या संधी मिळाव्यात, स्वच्छ हवा आणि मोठी मैदानं असावीत, महापालिकेच्या जागांवर मोफत पार्किंग आणि स्वच्छ प्रसाधनगृहं असावीत... अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर आम्ही चर्चा केली.
मुंबईत नवीन मेडिकल कॉलेजेस आणि जागतिक दर्जाचं 'कॅन्सर स्पेशालिस्ट' महापालिका रुग्णालय उभारण्याचं आमचं स्वप्न आहे. त्यासोबतच महिलांची सुरक्षा आणि त्यांच्यासाठी पोषक कामाचं वातावरण देण्यावर आमचा विशेष भर असेल.
ही निवडणूक फक्त जिंकण्यासाठी नाही, तर मुंबईकरांसाठी ही स्वप्नं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लढायची आहे… कारण आम्ही तयार आहोत, एका नव्या आणि अधिक चांगल्या मुंबईसाठी!
जय महाराष्ट्र !
मराठी माणसांना 5 लाख घरं देणार
आपल्या सहकाऱ्यांनी कार्यालय फोडलं नाही, एबी फॉर्म गिळला नाही, कुठेही शिवीगाळ केलेली नाही, कुठेही मारामारी केलेली नाही. सगळ्यांनी समजून घेतलं आणि ही निष्ठा असते. हाच फरक आहे, आपल्यात आणि त्यांच्यात असं अमित ठाकरे म्हणाले. मराठी माणसांना परवडणाऱ्या दरात पाच वर्षात 1 लाख घरं देणार आहोत, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा वचननामा जाहीर होण्यापूर्वी आज अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी त्यात काय असेल त्याचा थोडक्यात अंदाज दिला.
आदित्य ठाकरे यांनी बेस्टच्या बसेसचे दर पुन्हा कमी करणार असल्याचं सांगितलं. मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांना नोंदणीकृत करुन स्वाभिमान निधी 1500 रुपये देणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. मुंबईकरांना मोकळा श्वास करांमध्ये मिळाला पाहिजे. मुंबई महापालिकेत सत्ता आल्यानंतर 700 स्क्वेअर फूट पर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर कमी करणार असल्याचं सांगितलं.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवसेना भवनातून वचननामा जाहीर करतील. राज ठाकरे 20 वर्षानंतर शिवसेना भवनात दाखल होतील. नव्या शिवसेना भवनात राज ठाकरे पहिल्यांदा पाऊल ठेवतील.