Raj Thackeray Amit Thackeray: मार्मिकची सुरुवात ज्या दादर माहीममध्ये झाली. शिवसेनेची सुरुवात झाली, सामनाची सुरुवात झाली. त्याच दादर माहीममध्ये आज पहिल्यांदा एक ठाकरे निवडणुकीत उभा राहतोय, अशी भावनिक साद मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घातली. राज ठाकरेंनी काल पुत्र अमित ठाकरेंसाठी (Amit Thackeray) प्रभादेवीमध्ये जाहीर सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो- राज ठाकरे
लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा मनात पण नव्हते अमित ठाकरे निवडणुकीला उभा राहणार...माझ्या काय त्याच्याही मनात नसेल. पण जे समोर येतील त्यांच्याशी लढू, पण अमित ठाकरेंना नक्की निवडून आणणार, असं राज ठाकरे यांनी सांगितले. नेत्यांची आणि सरचिटणीसची बैठक झाली, तेव्हा अमित ठाकरे बोलला की सर्व नेत्यांनी उभं राहीलं पाहिजे, मी पण उभा राहील. आम्ही पण बैठक घेतली, त्यात त्याला विचारलं तु निवडणुकीसाठी उभा राहणार आहेस? अमित बोलला तुम्ही सांगाल तर राहील. आज अमित ठाकरेंच्या विरोधात जी माणसे उभी आहेत, त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, मात्र त्या घाणीत मला हात घालायचा नाही, असं राज ठाकरेंनी सांगितले. तुमच्या हाकेला 24 तास ओ देणारी माणसे हवीत. अमित राज ठाकरे असे जरी नाव असले तरी तुम्हाला त्याला भेटण्यासाठी अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
मी कुटुंबाच्या आड कधी राजकारण आणत नाही- राज ठाकरे
प्रत्येकासाठी मी सभा घेतोय. हा सगळा इतिहास जेव्हा मी बघतो त्यानंतर 2006 ला मी शिवसेनेतून बाहेर आलो. मी तेव्हा म्हटलं होतं, माझा वाद विठ्ठलाशी नाही, तर आजूबाजूला असणाऱ्या बडव्यांशी आहे. त्यावेळी 37-38 आमदार आले होते. 7-8 खासदार आले होते. ते म्हणत होते की दुसऱ्या पक्षात जाऊया...मी तेव्हा त्यांना म्हणालो की माझा वाद बाळासाहेबांशी नाही. त्यांना जेव्हा कळलं मी जाणार, तेव्हा त्यांनी मला मिठी मारली होती. मला पक्ष फोडायचा नव्हता, माझ्यात ताकद असेल तर मी माझा पक्ष काढेन. तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळी उद्धव ठाकरे आजारी पडले. त्यावेळी मी पहिल्यांदा गाडी घेऊन गेलो होतो. मी कुटुंबाच्या आड कधी राजकारण आणत नाही. गेल्या वेळी आदित्य ठाकरे वरळीतून निवडणुकीसाठी उभा होता , तेव्हा मी मनाने उमेदवार नाही दिला. त्यावेळी मी विचार केला की नाही आमच्या घरातील उमेदवार आहे, मी वरळीला उमेदवार देणार नाही. वरळीत मनसेची 38 हजार मतं आहेत. पण मी हे सर्व माझ्या मनाने केलं, कोणाला फोन केला नाही, असं राज ठाकरेंनी सांगितले.