सोलापूर : महापालिका निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याची हत्या घडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या हत्याकांडानंतर राजकीय सोलापुरातील वर्तुळातूनही स्थानिक भाजप नेत्यांवर टीका होत आहे. विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज माघारी घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी झालेल्या खटाटोपातून हा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आज सोलापुरात (Solapur) मृत मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी, घडल्या प्रकाराबाबत मत व्यक्त करताना त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं आहे. तसेच, आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असून राज ठाकरे यांच्याही कानावर ही घटना घातल्याचं त्यांनी म्हटलं.
महापालिका निवडणुकांमध्ये पैसे देऊन फॉर्म परत घेण्यापर्यंत ठीक होतं. मात्र, उमेदवारी मागे घेण्यावरुन आता खून करू लागले आहेत. समोरच्या पक्षातल्या लीडरकडे देखील मुलं-मुली आहेत, मी जसं बघितलं तसं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी बघावं, असे म्हणत अमित ठाकरे यांनी सोलापुरातील घटनेवरुन संताप व्यक्त केला. अशा निवडणुका असतील तर नको आम्हाला निवडणुका, आम्ही सगळे फॉर्म परत घेतो तुम्हीच जिंका अशा निवडणुका? महाराष्ट्राची ही परिस्थिती आणून ठेवलीय तुम्ही, अशा शब्दात संताप व्यक्त केला.
कधी कोणीही वारल्यावर मी राजकारण करत नाही, आज देखील सांत्वन करायला आलो आहे. तुमचं राज्य कुठे नेऊन ठेवलंय हे तुम्हाला कधी कळणार आहे की नाही? आपल्या सगळ्यातला माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती एक दिवस प्रचार सोडा आणि इथे या, निवडणुका कोणत्या पातळीला नेऊन ठेवल्या आहेत हे तुम्हाला कळेल. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आपलं राज्य कुठे चाललं आहे त्यांनी पाहिलं पाहिजे, असेही अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटले. तसेच, एक आई, दोन मुली आज अस्थिविसर्जन करून आले आहेत, ही कोणती परिस्थिती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजे, बाळासाहेबांना न्याय मिळाला पाहिजे, असेही अमित ठाकरेंनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांनी मला 10 मिनिटे वेळ द्यावा
फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून दहा मिनिटे वेळ मला द्यावी, मी सर्व विषय त्यांच्यासमोर मांडेन. सोलापूरकर म्हणून विचार केला पाहिजे, कुठे नेऊन ठेवतोय आपलं शहर? असेही अमित ठाकरे यांनी म्हटले. तर, मुलींच्या शिक्षणाचा सगळा खर्च मी करणार, मी इथे आर्थिक विषयावर काही बोलणार नाही, राज साहेबांनी मुख्यमंत्री यांच्याशी बोलणं केलं आहे, अशी माहितीही अमित यांनी यावेळी दिली.
हेही वाचा
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश