Akola Mayor : अकोला महापालिकेत (Akola Municipal Corporation) सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने भाजपची (BJP) पावलं अधिक ठाम होत असताना, आता महापौरपदासाठीही पक्षाकडून ‘युवा कार्ड’ खेळलं जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गटनेतेपदावर युवा नेतृत्वाला संधी दिल्यानंतर भाजप आता महापौरपदासाठीही तरुण चेहरा पुढे आणण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
Akola Mayor : भाजपचा 44 नगरसेवकांचा दावा, सत्तेचा मार्ग मोकळा
भाजपने नुकतीच अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात 44 नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी केली आहे. 80 सदस्यांच्या अकोला महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा करण्यात आल्याने, शहरात भाजपची सत्ता येण्याची शक्यता अधिक बळावली आहे. या गटाच्या गटनेतेपदी भाजपने भाजयुमोचे अकोला महानगराध्यक्ष आणि युवा चेहरा पवन महल्ले यांची निवड केली आहे. गटनेतेपदासाठी तरुण नेतृत्वावर विश्वास दाखवल्यानंतर, महापौरपदासाठीही त्याच धर्तीवर निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Akola Mayor : महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव
अकोला महापालिकेतील महापौरपद हे यावेळी ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून नितू जगताप या महापालिकेतील सर्वात तरुण नगरसेविकेचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. नितू जगताप या प्रभाग क्रमांक 3-ब मधून पहिल्यांदाच भाजपकडून निवडून आल्या असून, त्या केवळ 25 वर्षांच्या आहेत. त्या शिक्षण आणि व्यवसायाने इंटेरियर डिझायनर असून, त्यांच्या तरुण वयामुळे आणि ओबीसी महिला प्रवर्गातील स्थानामुळे त्या महापौरपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.
Akola Mayor : तरुण नेतृत्वाला संधी मिळण्याची दाट शक्यता
भाजपकडे सध्या ओबीसी प्रवर्गातील 16 महिला नगरसेविका आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी भाजपमध्ये 40 टक्के तरुणांना तिकीट आणि पदे दिली जातील अशी घोषणा केली होती. त्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात गटनेतेपदानंतर आता महापौरपदावरही तरुण नेतृत्वाला संधी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. जर नितू जगताप यांची महापौरपदी निवड झाली, तर त्या अकोला शहराच्या इतिहासातील सर्वात तरुण महापौर ठरणार आहेत.
Who is Neetu Jagtap: कोण आहेत नितू जगताप?
25 वर्षीय नितू जगताप या शिक्षण आणि व्यवसायाने इंटेरियर डिझायनर आहेत. प्रभाग क्रमांक 3-ब मधून भाजपकडून पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेविका आहेत. त्यांचे वडील महादेव उर्फ बबलू जगताप हे वंचित बहुजन आघाडीकडून सलग दोन वेळा अकोला महापालिकेत नगरसेवक झाले आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी बबलू जगताप यांनी वंचितमधून भाजपमध्ये प्रवेश केलाय.
आणखी वाचा
