Ahilyanagar Election 2026: अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या (Ahilyanagar Municipal Election 2026) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या सुरक्षारक्षकाने बंदूक दाखवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता इशारा दिलाय.
समोरील पक्षाच्या उमेदवाराने प्रचार करू नये, यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक आणि बॉडीगार्ड हे उमेदवाराच्या घराबाहेर रिव्हॉल्वर घेऊन उभे राहत असल्याचा गंभीर दावा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. उमेदवाराच्या आपबीतीचा व्हिडीओ त्यांनी समाज माध्यमांवर शेअर केल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र हे सर्व आरोप आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले होते.
Ahilyanagar Election 2026: त्यांची गाठ थेट निलेश लंकेशी
दरम्यान, अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याच्या प्रकाशनावेळी खासदार निलेश लंके यांनी या प्रकरणावरून विरोधकांवर जोरदार प्रहार केला. “उमेदवारांना धमकावून, दहशत लादून निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांची गाठ थेट निलेश लंकेशी आहे,” असा इशारा त्यांनी दिला.
Ahilyanagar Election 2026: आम्ही शांततेने राजकारण करणारे लोक
“आमच्या उमेदवारांना पिस्तूल दाखवून धमकावले जात आहे. आम्ही शांततेने राजकारण करणारे लोक आहोत; मात्र गरज पडल्यास हात वर करायलाही मागे हटणार नाही,” असे ठणकावून सांगत लंके यांनी आक्रमक भूमिका मांडली. निवडणूक लोकशाही मार्गाने व्हावी, जनतेचा कौल सर्वांनी स्वीकारावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. आता निलेश लंके यांच्या इशाऱ्यानंतर संग्राम जगताप काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Ahilyanagar Election 2026: निलेश लंकेंचे विखे पिता-पुत्रांवर टीकास्त्र
दरम्यान, अहिल्यानगर मनपा निवडणूक प्रचार सभेत बोलताना जिल्ह्यात झालेल्या सिस्पे आर्थिक घोटाळा प्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर खासदार निलेश लंके यांच्यावर टीका करण्यात आली होती. या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. अनेक पुढारी वेगवेगळ्या कार्यालयाच्या उद्घाटनाला जातात मग त्यात आर्थिक घोटाळा झाल्यावर तो पुढारी जबाबदार असतो का? असा प्रतिसवाल त्यांनी केला. सिस्पेमध्ये आर्थिक घोटाळा झाल्यावर मी दिल्लीला जाऊन शरद पवारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या घोटाळ्याची चौकशीची मागणी करायला सांगितली. नगर शहरात रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचे विखेंच्या प्रवरा बँकेत विलीनीकरण झाले. हजारो ठेवीदारांचे पैसे अडकले त्याचे काय? असं म्हणत खा. लंके यांनी विखे पिता-पुत्रांवर टीकास्त्र डागले.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
