मुंबई : देशभरातील जवळपास 600 नाट्य कलाकार भाजप सरकारविरोधात एकवटले आहेत. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि अभिनेत्री रत्ना पाठक-शाह या दाम्पत्यासह दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा यासारख्या कलाकारांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे.

'कट्टरता, द्वेष, आणि उदासीनतेला सत्तेपासून दूर ठेवा' असं आवाहन सहाशे कलाकारांनी पत्रक काढून मतदारांना केलं आहे. या पत्रकाखाली नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक-शाह, अमोल पालेकर, अनुराग कश्यप, कोंकणा सेन शर्मा, डॉली ठाकोर, लिलिएट दुबे, अभिषेक मजुमदार, संजना कपूर यासारख्या 616 कलाकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

'धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि सर्वसमावेशक भारतासाठी मतदान करा, भाजप आणि त्याच्या सहयोगींविरोधात मत द्या.
कमजोरांना सशक्त करण्यासाठी, पर्यावरण रक्षणासाठी आणि वैज्ञानिक विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी मतदान करा' असं आवाहन या पत्राद्वारे करण्यात आलं आहे. हे पत्रक विविध बारा भाषांमध्ये प्रसारित करण्यात आलं आहे.

VIDEO | विकासाची भाषा हरवली, हिंदुत्त्वाचा जप सुरु- शरद पवार | बारामती



स्वतंत्र भारताच्या इतिहासात या सर्वात महत्त्वाच्या निवडणुका आहेत. विकासाची आश्वासनं देत भाजप सत्तेत आली. मात्र द्वेष आणि हिंसाचाराच्या राजकारणात त्यांनी "हिंदुत्व गुंडांना मुक्तसंचार" करु दिला, असंही या पत्रकात म्हटलं आहे.

पाच वर्षांपूर्वी ज्याची राष्ट्राचा रक्षणकर्ता अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली होती, त्याने आपल्या धोरणांद्वारे लाखो नागरिकांची उपजीविका नष्ट केली, असाही दावा या पत्रकात करण्यात आला आहे.