मुंबई : शरद पवार आणि सोनिया गांधींच्या भेटीत नेमकं काय झालं? मुख्यमंत्रीपदावरुन सध्या शिवसेना जोरदार गुरगुर करतेय, पण ज्या दुसऱ्या पर्यायाची चाचपणी शिवसेनेला करावी लागेल त्यात काँग्रेसची भूमिका कळीची ठरणार आहे. म्हणूनच काल दिल्लीत पवार आणि सोनियांची भेट ही महाराष्ट्राच्या सत्ताकारणावर परिणाम करणारी होती. काय होता या बैठकीत सोनियांचा मूड, शिवसेनेबद्दल सोनिया गांधींना नेमकं काय वाटतं, याची खास माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे.


काँग्रेस हायकमांडला शिवसेनेबद्दल काय वाटतं?
- काँग्रेसचं दिल्ली हायकमांड अदयाप शिवसेनेबद्दल द्विधा मनस्थितीत आहे.
- भाजपला धडा शिकवण्यासाठी राज्यातले नेते सेनेसोबत जायची इच्छा व्यक्त करत असले तरी केंद्र स्तरावरचे नेते मात्र सेनेबद्दल काहीसे साशंक आहेत.
- राष्ट्रीय पातळीवरच्या काही मुद्द्यांवर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये टोकाची भूमिका आहे. त्यामुळे केवळ भाजपला दूर ठरवण्यासाठी ही अडचणीची सोयरीक करायची का हा काँग्रेससमोरचा प्रश्न आहे.

सोनिया गांधी सध्या शिवसेनेबद्दल अनुकूल नसल्या तरी राष्ट्रवादी-शिवसेनेच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत असंही नाही. कारण राज्यातल्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शरद पवार पुन्हा सोनिया गांधींना भेटणार आहेत. त्यामुळे या बैठकीतच काँग्रेसच्या भूमिकेबद्दल स्पष्टता येईल. तोपर्यंत शिवसेना-भाजपच्या खेळाचं काय होतं यावरही बरंच काही अवलंबून असेल.

काँग्रेस आणि शिवसेना राजकीय विचारांची दोन टोकं असली तरी राजकारणात अनेकदा व्यवहार्य भूमिका घेत त्यांनी हातमिळवणी केल्याचा इतिहास आहे. 1980 सालचं मार्मिकचं हे मुखपृष्ठ त्याचीच आठवण करुन देणारं आहे. हाताचा आणि वाघाचा पंजा..दोघेही एकमेकांना साथ देत उभे आहेत. शिवाय छत्री उडाली, कमळे बुडाली, जनता धन्य धन्य झाली..अशी टोलेबाजीही करण्यात आली आहे.

1997 साली शिवसेनेच्याच पाठिंब्यावर काँग्रेसचे मुरली देवरा मुंबईत महापौर झाले. राष्ट्रपतीपदासाठी प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी यांना एनडीएत असूनही शिवसेनेने जाहीरपणे पाठिंबा दिला होता. शिवसेनेने आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधींना पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे आता भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला मदत करणार याची उत्सुकता आहे.

शिवसेनेला थेट समर्थन करण्याऐवजी काँग्रेस बाहेरुन पाठिंब्याचं पाऊल उचलू शकतं. पण या सगळ्या समीकरणाची सुरुवात नेमकी कशी होणार हा देखील प्रश्न आहे..कारण त्यासाठी शिवसेनेला पुढाकार घेऊन सत्तास्थापनेचा दावा करावा लागेल...किंवा भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिघांची युती पाहायला मिळू शकते. नेमकं काय होतंय हे लवकरच कळेल, पण तोपर्यंत महाराष्ट्रात पडद्यामागच्या हालचालींना वेग आला आहे हे नक्की.