मुंबई : सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. आमदार फुटीच्या भीतीच्या रंगशारदा हॉटेलमध्ये तात्पुरत्या मुक्कामाला असलेल्या शिवसेना आमदारांना तिथून हलवण्याच्या हालचारी सुरु झाल्या आहेत. दुपारपासून दोन एसी बस रंगशारदा हॉटेलबाहेर उभ्या आहेत. रंगशारदा हॉटेलमध्ये राहण्याची अडचण होत असल्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येणार आहे. मोठा पोलिस फौजफाटा इथे तैनात करण्यात आल्या आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच आमदार आदित्य ठाकरे रंगशारदामध्ये जाऊन आमदारांची भेट घेणार आहेत.


सकाळपासून शांतता असलेल्या रंगशारदाबाहेर दुपारपासून हाचलाची वाढल्या. सकाळपासूनच इथे शिवसेनेच्या नेत्यांची रेलचेल वाढू लागली. परंतु आमदारांना कुठे हलवणार ही माहिती मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. त्यासाठी हॉटेलबाहेर बस उभ्या आहे. काही वेळातच त्यांना हॉटेलमधून दुसरीकडे हलवण्यात येणार आहे.

अनिल परब, मिलिंद नार्वेकरांच्या खांद्यावर जबाबदारी
रंगशारदा हॉटेलमधील सर्व आमदारांची जबाबदारी अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर आहे. अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे जवळचे विश्वासू नेते मानले जातात. या दोघांच्या नेतृत्त्वाखाली सर्व आमदारांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येत आहे. अनिल परब यांची संपूर्ण टीम सर्व आमदारांवर लक्ष ठेऊन आहे. प्रत्येक तासांची अपडेट अनिल परब उद्धव ठाकरेंना पोहोचवत आहेत.

आमदार फोडले जाऊ नये म्हणून शिवसेनेची खबरदारी
शिवसेनेच्या आमदारांशी इतर कोणाचाही संपर्क होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची रवानगी हॉटेल रंगशारदा झाली आहे. आमदार फुटीच्या भीतीने सेनेने हे पाऊल उचलल्याचं कळतं. सत्ताधाऱ्यांनी सर्व पक्षांचे आमदार फोडण्याचा गेल्या काही दिवसात प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यासाठी भाजपने गुंडांचा, धमक्यांचा वापर केल्याचेदेखील राऊत यांनी सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे..

आमदार हॉटेलमध्ये का? संजय राऊत म्हणतात...
शिवसेना आमदारांना सध्या मुंबईतील रंगशारदामध्ये ठेवण्यात आलं आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले की, "कोणताही निर्णय घेताना सगळे आमदार एकत्र असावेत म्हणून त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. तसंच काही नवीन आमदारांना अद्याप आमदार निवास मिळालेलं नाही. राहायची व्यवस्था नाही, त्यामुळे ते हॉटेलमध्ये एकत्र राहतील."

कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न
आमदार फुटीच्या भीतीने शिवसेना आमदारांना मुंबईतील रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर काँग्रेस आमदारांनाही अज्ञात स्थळी नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. याविषयी संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात पैसा आणि सत्तेद्वारे कर्नाटकप्रमाणे घोडेबाजार होण्याची भीती वाटत असेल तर ते लोकशाहीचं, पंतप्रधानांच्या स्वच्छ कारभाराच्या स्वप्नाला महाराष्ट्राने दिलेलं आव्हान आहे. पडद्याच्या मागे काय होत आहे. कर्नाटक पॅटन राबवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना. पण महाराष्ट्रात हा प्रयत्न होणार नाही.