मुंबई : सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमधील तिढा सुटण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजपमधील वादाला निमित्त ठरलेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य मागे घेण्यासाठी 'वर्षा' बंगल्यावर ड्राफ्ट बनवण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात शिवसेना नेत्यांशी संपर्क साधून कोंडी फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याचं कळतं.

दरम्यान, मसुदा वगैरे काही नको, मुख्यमंत्रीपदावर बोला. आम्हाला मुख्यमंत्रीपदाचं पत्र हवं, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

दिवाळीनिमित्त पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता, असं वक्तव्य केलं होतं. परंतु हे वक्तव्य शिवसेनेच्या अतिशय जिव्हारी लागलं. तेव्हापासून शिवसेनेने भाजपला चर्चेसाठी कोणताच प्रतिसाद दिलेला नाही. लोकसभेच्यावेळी जे ठरलं होतं, ते व्हावं, असं उद्धव ठाकरे वारंवार बोलत आहेत.

मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद
महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होण्यासाठी काही तासच शिल्लक राहिले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच माध्यमांशी बोलणार आहेत. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार? विधानसभेचा कार्यकाळ विसर्जित होणार असल्याने राजीनामा देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.