नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेबाबत आज दिल्लीमध्ये भाजपच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी सकारात्मक भूमिका असली तरी मुख्यमंत्रिपदावर कुठलीही तडजोड केली जाणार नाही असे संकेत मिळत आहेत.


शिवसेनेसोबत बाकी गोष्टींची चर्चा करण्याची तयारी आहे मात्र मुख्यमंत्रीपदासाठी हायकमांडचा स्पष्ट नकार आहे. या घडामोडींमध्ये वेळ आली तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी आहे पण शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले जाणार नाही. शिवाय सध्या महाराष्ट्रात नेतृत्व बदलाची जी चर्चा सुरु आहे त्याला ही पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे. कारण महाराष्ट्रामध्ये सरकारचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस हेच करणार, देवेंद्र यांच्याच पाठीशी हायकमांड ठाम असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

भाजप एकट्याने सत्तास्थापनेचा दावाही करणार नाही. शिवसेनेशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतरच हा सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल, तोपर्यंत कुठलाही धोका पत्करला जाणार नाही असे देखील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर अडलेली शिवसेना भाजपच्या या भूमिकेवर आता नेमकी कशी रिअँक्ट होते हे पाहणे महत्त्वाचं असेल.