मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सरकार स्थापनेबद्दल आपला निर्णय जाहीर करु शकतात. दरम्यान या बैठकीसाठी शिवसेना आमदार मातोश्रीवर पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. खबदारीचा उपाय म्हणून या बैठकीत मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. तर मातोश्रीला छावणीचं स्वरुप आलं आहे. मातोश्रीबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.


यानंतर शिवसेनेच्या आमदारांशी इतर कोणाचाही संपर्क होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची रवानगी नरिमन पॉईंट इथल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये होणार आहे. आमदार फुटीच्या भीतीने शिवसेना हे पाऊल उचलणार असल्याचं कळतं. सत्ताधाऱ्यांनी सर्व पक्षांचे आमदार फोडण्याचा गेल्या काही दिवसात प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यासाठी भाजपने गुंडांचा, धमक्यांचा वापर केल्याचेदेखील राऊत यांनी सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे.

तर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करावा : संजय राऊत  
सत्तास्थापनेचा संघर्ष अंतिम टप्प्यात आलेला असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल याचा पुनरुच्चार केला आहे. त्यासोबतच कोणत्याही परिस्थितीत शिवसेना आमदार फुटणार नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसंच भाजपकडे 145 चा आकडा असेल तर त्यांनी सरकार स्थापनेचा दावा करावा. त्यांच्या हातात सत्ता, पैसा आणि पॉवर असल्यामुळे ते सत्ता स्थापनेचा प्रयत्न करतील. पण महाराष्ट्रात आम्ही ते होऊ देणार नाही, असं म्हणत राऊत यांनी भाजपला आव्हान दिलं आहे.

भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन आठवडे सुरु असलेला सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिनिधी म्हणून आज चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार  राज्यपालांची भेट घेणार आहेत. दुपारी 2 वाजता ही भेट होणार आहे. यात भाजप सत्ता स्थापनेचा दावा करतं का हे पाहणं महत्वाचं आहे. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून चौदा दिवस लोटले तरी राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नाही. त्यामुळे अनेक कामं आणि निर्णय रखडले आहेत. तसंच 9 नोव्हेंबर रोजी राज्याच्या विधीमंडळाची मुदतही संपतं आहे. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रपती राजवट लागू होऊ नये यासाठी आजच सत्तेचा तिढा सोडवणं आवश्यक आहे. त्यादृष्टीने मुंबईत आज घडमोडी वेगाने घडत आहेत.