सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, वैभव गयानकर यांच्यासह अनेक कलाकारांनी आज #पुन्हानिवडणूक हा एक हॅशटॅग वापरुन ट्वीट केले आहे. सगळ्या कलाकारांनी एकाच वेळी एकच ट्वीट केल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. ज्या पद्धतीने एकाच वेळी कलाकार #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत आहेत. त्यातच भाजप आयटी सेलही सक्रिय झाली आहे. भाजप असं करु शकते. भाजप सूडाचं राजकरण करुन इथे अनैतिकता पसरवत आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे.
मराठी कलाकारांचा वापर होऊ नये : काँग्रेस
सचिन सावंत म्हणाले की, "कोब्रो पोस्टच्या व्हिडीओमध्ये दिसलं होतं की भाजप पैसे देऊन हिंदी कलाकारांना ट्वीट करायला सांगतात. मराठी कलाकारांचा असा वापर होऊ नये. भाजप असं करु शकते. भाजप सूडाचं राजकारण करुन इथे अनैतिकता पसरवत आहे. मराठी कलाकारांचा वापर ते करु शकतात यात नवीन काही नाही. असं होऊ नये, महाराष्ट्रात अशी प्रथा पाडू नये."
सिनेमाच्या प्रमोशनसाठी हॅशटॅग?
दरम्यान, मराठी कलाकारांनी एकाच वेळी #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरण्यामागची दुसरी बाजू समोर आली आहे. हा एक प्रमोशनाचा भाग आहे. धुरळा नावाचा सिनेमा येत आहे. त्याचाच भाग म्हणून हा हॅशटॅग करण्यात आला आहे.