नवी दिल्ली : राज्यातील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आहे. काँग्रेसचे चाणक्य अर्थात राज्यसभेचे खासदार अहमद पटेल यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात सस्पेन्स वाढवणारी ही भेट आहे. या भेटीमुळे महाराष्ट्रातील सत्ताकारणावर परिणाम होऊ शकतो. अहमद पटेल हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे उजवे हात म्हणून ओळखले जातात. सोनियांनंतर ते पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. बहुतांश सगळेच निर्णय त्यांच्या सल्ल्याने घेतले जातात. त्यामुळे त्यांची आणि नितीन गडकरींची भेट ही सगळ्यांच्याच भुवया उंचावणारी आहे.


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 14 दिवस उलटले तरी सत्ता स्थापनेचा मुहूर्त सापडलेला नाही. 9 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होईल. मात्र अजूनही शिवसेना आणि भाजप यांच्यातील चर्चा मुख्यमंत्रीपदावरुन अडली आहे. दोन्ही पक्षातील डेडलॉक अद्यापही कायम आहे. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात अशीही चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी (4 नोव्हेंबर) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. परंतु सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेत काँग्रेसची भूमिका महत्त्वाची आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 4 नोव्हेंबर रोजी भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. परंतु या भेटीतून काही ठोस हाती लागलं नाही. शिवाय राज्यातील सत्तासंघर्षावर दिल्लीतून विशेष हालचाली होत नाही. त्यामुळे कदाचित नितीन गडकरी त्यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अहमद पटेल आणि नितीन गडकरी यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

महाराष्ट्राचा 'म' सुद्धा काढला नाही : अहमद पटेल
शेतकरी, रस्त्याच्या प्रश्नावर नितीन गडकरी यांची भेट घेतली. ही राजकीय भेट नव्हती, अशी माहिती अहमद पटेल यांनी भेटीनंतर दिली. तसंच महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही, महाराष्ट्राचा म सुद्धा काढला नाही, असा दावाही त्यांनी केला.