Summit India Announces Virtual Education Summit : कोरोनासारख्या महाभयंकर साथीनंतर देशातील बदलत्या शिक्षण व्यवस्थेवर सर्वांगीण चर्चा घडवून आणण्यासाठी तब्बल तीन महिने चालणाऱ्या 'वसुधैव कुटुंबकम शिक्षण शिखर परिषद 2022'चे आयोजन करण्यात आलं आहे. 'समिट इंडिया'ने 'टेक अवंत- गर्दे'च्या सहकार्यानं आयोजित केलेल्या या शिखर परिषदेची सुरुवात 20 ते 22 जानेवारी दरम्यान तीन दिवसीय आभासी (व्हर्च्युअल) परिषदेनं होणार असून परिषदेची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उद्घाटनपर संदेशानं होणार आहे.


राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि 'संकरित शिकणं' (हायब्रिड लर्निंग) यांच्याशी संबंधित बारकाव्यांवर विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते चर्चा करणार आहेत. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, कौशल्य विकास, उद्योजकता, इलेक्ट्रानिक आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, आदिवासी व्यवहार खात्याच्या केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मसुदा समितीचे सदस्य एम. के. श्रीधर, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे, राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एनसीईआरटी) संचालक प्रा. श्रीधर श्रीवास्तव, सीबीएसईचे कौशल्य आणि प्रशिक्षण संचालक डॉ. विश्वजीत सहा, असोसिएशन ऑफ स्कूल्स फॉर इंडियन स्कूल्स सर्टिफिकेटचे (एसआयसी) राष्ट्रीय सचिव के. व्ही. व्हिन्सेंट, शिक्षा संस्कृती उत्थानचे राष्ट्रीय सचिव अतुल कोठारी, मायक्रोसॉफ्ट इंडियाचे एज्युकेशन अॅड्वोकसीचे संचालक डॉ. विनी जोहरी या परिषदेत आपले विचार मांडणार आहेत.


शिक्षण शिखर परिषदेविषयी माहिती देताना 'समिट इंडिया'चे अध्यक्ष श्याम जाजू म्हणाले, "राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020चे ध्येय-दृष्टी पुढे नेण्यासाठी, त्यावर सर्वांगीण चर्चा घडवून आणण्यासाठी आम्ही 'वसुधैव कुटुंबकम-आभासी (व्हर्च्युअल) शिक्षण शिखर परिषद 2022’चे आयोजन केलं आहे. भारतासाठीच्या नव्या शिक्षण पद्धतीचा आराखडा मांडणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळं आपल्या शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तापूर्ण सुधारणा होणार असून आपले शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जासमान होईल, ज्याचा आपल्या भावी पिढ्यांवर निश्चितच सकारात्मक परिणाम होईल."


तीन दिवसीय परिषदेनंतर 29 जानेवारी ते 9 एप्रिल 2022 दरम्यान साप्ताहिक पॅनल चर्चा होणार आहेत. करोना महासाथीनंतरच्या, डिजिटली रुपांतरित झालेल्या शिक्षण व्यवस्थेसमोरील विविध आव्हानं आणि संधी यांबाबत इथे सखोल चर्चा होईल. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी 202), डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि होलिस्टिक लर्निंग (डीटीएचएल), तसंच संकरित शिक्षण (हायब्रिड लर्निंग) यांद्वारे भारतीय शिक्षण व्यवस्थेची अशी एक मजबूत चौकट तयार होईल, जी 'डिजिटल-नेटिव्ह' विद्यार्थ्यांच्या सर्व गरजांची पूर्तता करण्यास सक्षम असेल. 


हायब्रिड लर्निंग आणि तंत्रज्ञानाच्या भूमिकेविषयी माहिती देताना 'टेक अवंत- गर्दे'चे सीईओ अली सैत म्हणाले, "शिकण्यासाठी तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा किती वापर होऊ शकतो, याचा अंदाज सर्वचजण घेऊ लागलेत. आजच्या जगात ज्ञान हीच सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. त्यामुळे माहिती-श्रीमंत, विकसित तंत्रज्ञान-सक्षम आणि सहयोगी शिक्षण वातावरणाचे फायदे विद्यार्थी, शिक्षक, शाळा आणि एकंदरच संपूर्ण समाजापर्यंत कोणत्याही प्रकारचं बंधन नसलेल्या शिक्षणाद्वारे पोहोचायलाच हवेत. 'वसुधैव कुटुंबकम शिक्षण परिषद' हा असा एक उपक्रम आहे, ज्याद्वारे हायब्रिड लर्निंग तसंच राष्ट्रीय शिक्षण धोरणाबाबतची जागरुकता वाढेल, आणि साहजिकच त्याद्वारे आपली शिक्षण व्यस्था, आपला समाज भविष्यातील आव्हानं पेलण्यास सज्ज होईल. 


वसुधैव कुटुंबकम शिक्षण शिखर परिषद सर्वांसाठी खुली असून त्याविषयीच्या अधिक माहितीसाठी https://vasudhaivakutumbakam.live/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI