कांदिवली, मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे (Mumbai University) पीएचडी पूर्व परीक्षा अर्थातच पेट परीक्षा आयोजित करण्यत आली होती. पण कांदिवलीमधील ठाकूर महाविद्यालयात या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला आहे. कारण सकाळी साडेदहा वाजता ही परीक्षा सुरु होणार होती. पण दोन तास उलटून गेले तरीही परीक्षा सुरु झाली नाही. त्यामुळे जवळपास 400 ते 500 विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर खोळंबल्याचं चित्र आहे.
दरम्यान काही तांत्रिक अडचणी आणि आयडी पासवर्ड नसल्याची कारणं विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. या परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर जमले आहेत. पण विद्यापाठाच्या या परीक्षेमध्ये ठाकूर महाविद्यालयात झालेल्या गोंधळावर विद्यार्थ्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यापीठाच्या या कारभारामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं पाहायला मिळतंय.
परीक्षा केंद्रावर पोलीसह पोहचले
परीक्षा केंद्रावर सुरु असलेल्या गोंधळाची माहिती पोलिसांना देखील मिळाली. ही माहिती मिळताच पोलीसही परीक्षा केंद्रावर पोहचले आहेत. रविवार 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ठाकूर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर हा सगळा गोंधळ सुरु होता. दरम्यान आता यावर पोलीस काही तोडगा काढणार की परीक्षा रद्द केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
चारही विद्याशाखांमधील विविध 77 विषयांसाठी ही पेट परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने ही परीक्षा नियोजित केंद्रांवरच घेण्यात येणार होती. सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 अशी या परीक्षेची नियोजित वेळ होती. पण या परीक्षा केंद्रावर मात्र विद्यार्थ्यांना अद्याप तरी परीक्षा देता आलेली नाही. दोन तासांच्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार विद्यार्थी परीक्षा सुरु होणाच्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित आहेत. त्यामुळे अडीच तास या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या खोळंबा झालाय.
ही बातमी वाचा :
मुंबई विद्यापीठाची आशियाई क्रमवारीत मोठी कामगिरी, क्यूएस आशिया रँकिंग 67 वरून 52 वर झेप
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI