NEET Exam Paper Leak: "पेपरफुटीसारख्या (Paper Leak) घटना केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत क्लेशदायक असतात. अशा घटनांमुळे आपण आपल्या देशातील तरुणांना निराश करता कामा नये. जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणातील त्रुटींबाबत जबाबदारी निश्चित केली जात नाही, तोपर्यंत ही मूळ समस्या थांबणार नाही," अशा कडक शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्र सरकारला सुनावले आहे. तसेच, राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात ‘एनटीए’ (National Testing Agency) अधिक सक्षम करण्यासाठी आणि ‘नीट’ (NEET) परीक्षा पूर्णपणे त्रुटीमुक्त करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार, यावर पुढील सहा आठवड्यांत प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत.

नीट पेपरफुटीनंतर दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर (Petitions) न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. या याचिकांमध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी ‘एनटीए’ऐवजी किंवा या संस्थेची पुनर्रचना करून एक नवीन मजबूत आणि स्वायत्त संस्था स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेचाही समावेश आहे.

NEET Exam Paper Leak: संस्थेमध्ये क्षमता विकसित करा, व्यक्तींवर अवलंबून राहू नका

देशातील बहुतांश संस्था या केवळ तात्पुरत्या स्वरूपाच्या व्यवस्थांवर चालत असल्याबद्दल खंडपीठाने चिंता व्यक्त केली. "परिस्थिती इतकी गंभीर आहे की, काही मोजकेच अत्यंत कार्यक्षम अधिकारी कार्यरत असतात आणि इतर सर्वजण केवळ त्यांच्यावरच अवलंबून राहतात. देशभरात हीच प्रवृत्ती दिसून येते. क्षमता ही एखाद्या व्यक्तीमध्ये नव्हे, तर ती संस्थेमध्ये अंतर्भूत असायला हवी. नेमकी तीच संस्थात्मक क्षमता तुम्हाला विकसित करणे गरजेचे आहे," असे न्यायालयाने नमूद केले. तसेच, सन 2024 आणि 2026 च्या नीट परीक्षेसारख्या वादांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एनटीएकडे आवश्यक भौतिक आणि बौद्धिक साधनसंपत्ती असणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

NEET Exam Paper Leak: पुढील वर्षापासून 'नीट' परीक्षा होणार डिजिटल 

सर्वोच्च न्यायालयाने 25 मे रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने ‘एनटीए’च्या विधी संचालकांनी न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रात संस्थेने भविष्यातील सुधारणांचा मोठा आराखडा मांडला आहे. तज्ज्ञांच्या उच्चस्तरीय समितीने दिलेल्या शिफारशीनुसार, केंद्र सरकारशी सल्लामसलत करून पुढील वर्षापासून नीट-यूजी (NEET-UG) परीक्षा पारंपारिक 'पेन आणि कागद'पद्धतीऐवजी 'संगणकाधारित चाचणी' पद्धतीने घेण्यास संस्था सज्ज असल्याचे एनटीएने म्हटले आहे.

NEET Exam Paper Leak: मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी 'एआय'चा वापर करणार

परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि गोपनीयता वाढवण्यासाठी एनटीएने अनेक मोठे बदल सुचवले आहेत. प्रश्नपत्रिका तयार करणारे, मध्यस्थ, तपासनीस आणि प्रूफरीडर यांच्या नियुक्तीसाठी रोटेशन धोरण अधिक कडक केले जाईल. मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी, वेळेची बचत करण्यासाठी आणि सुरक्षिततेशी तडजोड होण्याची शक्यता नष्ट करण्यासाठी किमान 85 टक्के भाषांतराच्या कामासाठी 'एआय-आधारित' साधनांचा वापर केला जाईल.

NEET Exam Paper Leak: पंतप्रधान स्वतः लक्ष ठेवून, केंद्र सरकारची माहिती

'इस्रो'चे (ISRO) माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील 'उच्चाधिकार सुकाणू समितीने'केलेल्या शिफारशींची नोंद न्यायालयाने घेतली असून, पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी खंडपीठाला आश्वस्त केले की, सरकार तरुणांच्या चिंतांबाबत अत्यंत गंभीर असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. 21 जून रोजी होणाऱ्या नीट-यूजी पुनर्परीक्षेसाठी काही नवीन अत्यंत कडक सुरक्षा यंत्रणा लागू केल्याची माहितीही त्यांनी न्यायालयात दिली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण कक्ष ते नोंदी आणि प्रमाणपत्रांसाठी 8 दिवसांत हेल्पलाइन; मनोज जरांगेंना सरकारची 5 मोठी आश्वासनं, जरांगे उपोषण मागे घेणार का?


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI