मुंबई :राज्य समाईक प्रवेश परीक्षाकक्षाकडून दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी एमएचटी-सीईटी 2025 (पीसीएम गट) सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक त्रुटी आढळल्या होत्या. या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले होते.
त्यामुळे सदर सत्रातील सर्व उमेदवारांसाठी फेर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेर परीक्षा दिनांक 5 मे 2025 रोजी होणार आहे, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे.
यावर्षी एमएचटी-सीईटी पीसीएम गटाची परीक्षा 19 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 दरम्यान 15 सत्रांमध्ये 197 परीक्षा केंद्रांवर पार पडली. एकूण 4,64,263 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 4,25,548 उमेदवारांनी परीक्षा दिली.
२७ एप्रिलच्या सकाळी घेतलेल्या सत्रात इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यमांतून एकूण 27837 उमेदवारांनी परीक्षा दिलेली होती.परीक्षेनंतर काही उमेदवार आणि पालकांनी इंग्रजी माध्यमातील गणित प्रश्नपत्रिकेत तांत्रिक त्रुटी असल्याबाबत तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने राज्य सीईटी कक्षाने तज्ञांमार्फत प्रश्नपत्रिकेची पडताळणी केली असता, 21 प्रश्नांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे आढळले.उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून सदर 27837 उमेदवारांची फेर परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांनी अधिकृत www.mahacet.org या वेबसाइटवर भेट देऊन अद्ययावत माहितीची नोंद घ्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI