MAHATET EXAM पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं महाटीईटीच्या तारखेत बदल केला आहे. आता महाटीईटी परीक्षा 21 जून ऐवजी 28 जूनला होणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठीची आवश्यक असलेली नीट यूजी परीक्षा 3 मे रोजी पार पडली होती. मात्र, त्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यानं संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली. आज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 21 जून रोजी नीट यूजी परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यामुळं महाटीईटी परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतला आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखेत बदल
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) - 2026 परीक्षेचे आयोजन 21 जून रोजी करण्यात आलं होतं. मात्र, नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं 21 जून रोजी नीट यूजी परीक्षेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. नीट यूजी परीक्षा संपूर्ण देशभरात विविध केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. नीट यूजी आणि महाटीईटी या दोन्ही परीक्षांची बहुतांशी केंद्र एकच येत असल्याने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाटीईटी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि परीक्षार्थींचं हित लक्षात घेत तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. यामुळं टीईटी परीक्षा 21 जून ऐवजी 28 जूनला होणार आहे.
विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कधी पासून मिळणार?
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र 16 जून ते 28 जून या कालावधीत मिळणार आहेत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे दोन पेपर असतात. 28 जून रोजी सकाळी 10.30 ते 1 वाजेपर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I आयोजित करण्यात येईल. यानंतर पेपर II दुपारी अडीच ते पाच वाजेपर्यंत घेण्यात येईल. याशिवाय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही सांगितलं आहे. अधिक अपडेटससाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटला भेट देत राहावं.
नीट यूजी परीक्षा 21 जूनला होणार
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी नीट यूजी पुनर्परीक्षा येत्या 21 जूनला होणार असल्याचं सांगितलं. याशिवाय विद्यार्थी स्वत: परीक्षा केंद्र निवडू शकतात. नीट यूजी परीक्षा पुन्हा घेत असताना विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही. याशिवाय 3 मे रोजी झालेल्या परीक्षेसाठी भरलेलं परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI