YCMOU University : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत डमी विद्यार्थ्यांकडून परीक्षा दिल्याचा प्रकार समजत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या परीक्षेत राज्यभरातील तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांचे चेहरे मिसमॅच असल्याचे समोर आले आहे.
फेस रिडींगसाठी प्रॉक्टर टेक्नॉलॉजीचा वापर
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत परीक्षार्थींच्या फेस रिडींगसाठी प्रॉक्टर टेक्नॉलॉजीचा करण्यात आला होता, मात्र याचा वापर करत डमी विदयार्थ्यांनी परिक्षा दिली असल्याची माहिती समजत आहे. विद्यापाठाच्या 56 शिक्षणक्रमाच्या 8 ते 25 फेब्रुवारी दरम्यान हिवाळी सत्राच्या परीक्षा संपन्न झाल्या. या परीक्षेत डमी परीक्षार्थींकडून ऑनलाइन परीक्षा दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
5 सदस्यांच्या समितीकडून डमी विद्यार्थ्यांचा शोध
या प्रकरणी 5 सदस्यांची समिती डमी विद्यार्थ्यांचा शोध घेत असल्याची माहिती मिळत आहे. फेस डिटेक्शनमधील विसंगती आणि विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिकच्या वॉर्निंगमुळे मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये हे केवळ परीक्षार्थींचे फेस मॅच न झाल्याचे गैरप्रकार समोर आले आहेत. प्रॉक्टर टेक्नॉलॉजीद्वारे कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेले सर्व पुरावे पडताळणी समितीकडे पाठविण्यात आले असून आता डमी विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षांमध्ये फेस रिडिंग होत असलेल्या प्रॉक्टर टेक्नॉलॉजीचा वापर करत परीक्षेतील गैरप्रकारांना पायबंद घातल्याचे सांगितले खरे, पण तरीही डमी सारखे गैरप्रकार समोर येत आहेत.
काय आहे प्रॉक्टर टेक्नॉलॉजी?
ऑनलाईन परीक्षा देताना प्रवेशासोबत विद्यार्थ्यांचे छायाचित्र घेतले जाते. त्यावेळी एक पीआरएन नंबर तयार होतो. यानंबरवर विद्यार्थ्याची सर्व माहिती उपलब्ध होते. ऑनलाइन परीक्षेच्या सुरुवातीला पीआरएन क्रमांक टाकावा लागतो. त्यानंतर वेब कॅमेऱ्याद्वारे फेस रिडिंग होते. विसंगती आढळल्यास सॉफ्टवेअरकडून वॉर्निंग दिली जाते व ते रेकॉर्ड होते. सॉफ्टवेअरद्वारे गैरप्रकार रेकॉर्ड केल्यानंतर त्याची माहिती तांत्रिक विभागाकडे प्राप्त होते. त्यानंतर ती माहिती पडताळणी समितीला दिली जाते. या विद्यार्थ्यांना समितीकडे आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. यावेळी ऑनलाइन परीक्षेला लॉगीन होतानाचा फोटो आणि फेस इमेजेस, प्रोफाईल, समक्ष आलेला विद्यार्थी यांची खात्री करून संबंधित विद्यार्थी दोषी आढळल्यास त्यांच्यावर विद्यापीठ नियमांनुसार कारवाई होणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI