मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना शेवटची संधी आहे. आतापर्यंत प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना 26 मार्चपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) या तत्त्वावर प्रवेशासाठी मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी सांगितलं आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यानंतर मराठा आरक्षण स्थगितीमुळे इयत्ता अकरावी प्रवेश प्रकिया लांबणीवर गेली. अकरावीच्या प्रवेशापासून काही विद्यार्थी अजूनही वंचित राहिल्याचं निदर्शनास आलं आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने राज्य सरकारकडे केली होती. या मागणीला मान्यता देण्यात आली असून शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या प्रवेश प्रक्रियेला अंतिम मुदतवाढ दिली आहे. 


ही आता शेवटची मुदतवाढ असेल, 26 मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही, असं शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत, केवळ त्यांच्यासाठीच ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. अन्य विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलणे, किंवा अन्य कारणांसाठी पुन्हा प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाणार नाही, असंही राजेंद्र पवार यांनी सांगितलं.


एफसीएफएस 2 ला ही मुदतवाढ देण्यात आली असून ही वाढीव वेळ फक्त इयत्ता अकरावी  प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन देण्यात आलेली आहे, असं शिक्षण विभागाने म्हटलं आहे. या दरम्यान झालेले प्रवेश रद्द केल्यास पुन्हा या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.


एफसीएफएस 3 चे वेळापत्रक
19 मार्च 2021 - (सकाळी 10 पासून ) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रधान्यनुसार विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळणार


19 मार्च 2021 ते 26 मार्च 2021 (सकाळी 11 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत)- प्रवेश मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेची सुरुवात.


26 मार्च 2021 - (संध्याकाळी 11.30 पर्यंत) संकेतस्थळवर महाविद्यालयांनी प्रवेशाचे स्टेटस अपडेट करणे


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI