CBSE Board Will Start National Credit Framework : नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) 2024-25 शैक्षणिक सत्रापासून प्रायोगिक तत्त्वावर इयत्ता सहावी, नववी आणि अकरावीसाठी 'राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क' लाँच करणार आहे. त्यासोबतच त्यांच्या संलग्न शाळांना त्यात सहभागी होण्यासाठी सीबीएसईनं आमंत्रित केलं आहे. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात बुधवारी सविस्तर माहिती दिली.


शालेय, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाचे अखंड एकत्रीकरण सुनिश्चित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यांचे क्रेडिट जमा करता यावे, यासाठी सरकारनं गेल्या वर्षी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या अंमलबजावणी अंतर्गत प्राथमिक ते Ph.D स्तरापर्यंत राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क (NCRF) लाँच केलं होतं. त्यानंतर सीबीएसईनं त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदाही तयार केला आहे


आता नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क अंतर्गत क्रेडिट सिस्टीमद्वारे शाळांमध्ये शिक्षण दिलं जाईल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं शैक्षणिक सत्र 2024-25 पासून इयत्ता सहावी, नववी आणि अकरावीमध्ये ही प्रणाली पायलट प्रोजेक्ट म्हणून लागू करण्याची तयारी केली आहे. या प्रणाली अंतर्गत, जर विद्यार्थ्यांनी इयत्ता नववीमध्ये वर्षातून 210 तास अभ्यास केला, तर त्यांना 40-54 क्रेडिट गुण मिळतील. सर्व विषयांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच हे क्रेडिट गुण देण्यात येणार आहेत. यासाठी वर्षभर वर्गात 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असेल. 


'राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क'साठी मार्गदर्शक तत्व 


सीबीएसईनं शाळांना या प्रणालीचा भाग होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. या संदर्भात बोर्डानं सीबीएसईशी संलग्न असलेल्या सर्व शाळा प्रमुखांना मार्गदर्शक तत्त्वांची माहिती पाठवली आहे. बोर्डानं राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्कसाठी मार्गदर्शक तत्व तयार केली आहेत आणि त्यासंबंधी अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. आता बोर्डानं याची परिणामकारकता तपासण्यासाठी इयत्ता सहावी, नववी आणि अकरावीमध्ये या मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रायोगिक अंमलबजावणीची योजना आखली आहे. राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्कची यशस्वी चाचणी सुनिश्चित करण्यासाठी CBSE जागरूकता सत्र, समुपदेशन कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत. यासोबतच प्रायोगिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या शाळांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 


'राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क' कसं असेल? 


विद्यार्थ्याला मिळणारे क्रेडिट्स शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जोडले जातील. विद्यार्थ्याला इयत्ता नववीसाठी ऑफर केलेल्या संभाव्य क्रेडिटनुसार, पाच विषय उत्तीर्ण करावे लागतील. त्यात दोन भाषा आणि तीन विषयांचा समावेश असेल. उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना क्रेडिट मिळू शकेल. प्रत्येक विषयासाठी 210 तास असतील. अशा प्रकारे पाच अनिवार्य विषयांना 1050 तास दिले जातील. 150 तास अंतर्गत मूल्यांकन, शारीरिक शिक्षण, कला शिक्षण आणि कार्यानुभवासाठी असतील. प्रत्येक विषयासाठी सात क्रेडिट्स असतील. विद्यार्थ्याला इयत्ता नववीत पाच विषय उत्तीर्ण झाल्यावर 40 क्रेडिट मिळतील. जर विद्यार्थ्यानं सहावा आणि सातवा विषय घेतला तर त्याचे क्रेडिट्स 47-54 असतील. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI