CBSE Board Exam 2023 Date Schedule : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (CBSE) काल (शुक्रवारी) बारावीचा निकाल जाहीर केला. तसेच, निकालासोबतच सीबीएसई बोर्डानं पुढील वर्षाच्या परीक्षांचं वेळापत्रकही जाहीर केलं. बोर्डाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2023 बॅचच्या अंतिम परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होतील. दरम्यान, यंदा सीबीएसई परीक्षांचा निकालाला खूपच उशीर झाला. अशातच सीबीएसई बोर्डाच्या पुढील वर्षाच्या तारखांबाबत बोलताना तज्ज्ञ म्हणाले की, जर बोर्डाची परीक्षा लवकर सुरू झाली आणि लवकर संपली तर निकाल देखील वेळेवर जाहीर होईल. 


केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) सत्र 2022-23 च्या बोर्डाच्या परीक्षांचा नवा पॅटर्नही जारी केला आहे. परीक्षांच्या नव्या पॅटर्ननुसार, बोर्डाच्या परीक्षेत तेच विद्यार्थी पुढे असतील, जे घोकमपट्टी ऐवजी समजून घेऊन अभ्यास (Study) करतील. यावेळी ऐच्छिक प्रश्न 50 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आले आहेत. तसेच, सत्र 2022-23 मध्ये, इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या परीक्षांमधील विद्यार्थ्यांचं मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या आकलनावर, सक्षमतेवर आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं जाईल. नवीन सत्राच्या परीक्षांमध्ये गुणवत्तेवर आधारित प्रश्नांची संख्या दहा टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं सर्व मुख्याध्यापकांसाठी परिपत्रक जारी केलं आहे.


CBSE बोर्डकडून 2021-22 चा निकाल जाहीर  


सीबीएसई दहावी आणि बारावीचा निकाल काल (शुक्रवारी) जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा सुमारे 92 टक्के निकाल तर दहावीचा 94 टक्के निकाल लागला आहे. दरम्यान सीबीएसई दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यामुळे रखडलेल्या ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंडळाच्या दहावीचा निकाल जाहीर होऊन एक महिना झाला तरी देखील अकरावी प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया रखडली होती. सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रिया मार्गी लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालकांचीही चिंता कमी होणार आहे.   


इतर राज्यात राज्य मंडळाचे बारावी निकाल जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी पदवी प्रथम वर्ष प्रवेश सुरु झाले होते. मात्र त्यावेळी यूजीसीने देशातील सर्व विद्यापीठांना सूचना देत सीबीएसई बारावी बोर्डाचे निकाल जाहीर झाल्यानंतरच पदवी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख जाहीर करावी असे सांगितले होते. त्यामुळे आता निकाल जाहीर झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना तातडीने पदवी प्रथम वर्ष प्रक्रियेत सहभाग घेऊन पसंतीचे कॉलेज निवडायचे आहे.


दरम्यान, यावर्षी कोरोना महामारीच्या काळात सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा या दोन टर्ममध्ये घेण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टर्मची परीक्षा ही एप्रिल-मे महिन्यात घेण्यात आली. त्यामुळे राज्य मंडळाच्या आधी जाहीर होणारा सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल यंदाच्या वर्षी उशिराने जाहीर झाला. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI