Ahilyanagar Success Story: अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील चास गावातील बापूसाहेब रतन गायकवाड (Bapusaheb Gaikwad) यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC) 561 वा क्रमांक मिळवला आहे. साध्या कुटुंबातून आलेल्या बापूसाहेब यांच्या या यशामुळे संपूर्ण गावासह जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बापूसाहेब गायकवाड यांचे बालपण आर्थिक अडचणींमध्ये गेले. त्यांच्या आईने धुणीभांडी करून कुटुंबाचा संसार सांभाळला, तर वडील वॉचमन म्हणून काम करत होते. मर्यादित साधनसामग्री आणि अनेक अडचणी असूनही बापूसाहेब यांनी शिक्षण आणि आपल्या ध्येयापासून कधीही माघार घेतली नाही.
Ahilyanagar Success Story: दररोज 8 ते 10 तास केला अभ्यास
उच्च शिक्षणानंतर त्यांनी मुंबईमध्ये सुमारे पाच वर्षे नोकरी केली. मात्र प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न त्यांनी कायम जिवंत ठेवले. अखेर 2017 मध्ये त्यांनी दिल्ली गाठत UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. दररोज 8 ते 10 तास अभ्यास करत त्यांनी सातत्याने मेहनत घेतली आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत त्यांनी संघर्षाच्या काळातही चिकाटी कायम ठेवली. कुटुंबीय आणि मित्रांनी दिलेले पाठबळ हे त्यांच्या यशामागील मोठे बळ ठरले.
Ahilyanagar Success Story: चास गावातून भव्य मिरवणूक
आपल्या यशाबाबत बोलताना बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले की, “स्पष्ट ध्येय आणि प्रामाणिक मेहनत असेल, तर कोणतीही प्रतिकूल परिस्थिती आपल्याला थांबवू शकत नाही.” दरम्यान, UPSC मध्ये उल्लेखनीय यश मिळवल्यानंतर बापूसाहेब गायकवाड यांचे गावात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. चास गावातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कारही करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे चास गावासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचा मान उंचावला आहे.
Ahilyanagar Success Story: तीन भाऊ एमपीएससीत यशस्वी
दरम्यान, अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील चंदन कुटुंबातील तिघा भावांनी एमपीएससी उत्तीर्ण होत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि उखलगाव सारख्या दुर्गम भागातील अजय, मालन, चंदन यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केलीये. यात सर्वात मोठा भाऊ दिलीप मालन चंदन हा पोलीस निरीक्षक झालाय. तर दुसरा भाऊ विजय मालन चंदन हा सहा.पोलीस निरीक्षक झाला आहे. तर हीच परंपरा कायम ठेवत नुकतेच राज्यकर निरीक्षक म्हणून अजय मालन चंदन नियुक्त झाले आहे. या तीन सख्ख्या भावांच्या एमपीएससी परीक्षेतील घवघवीत यशाने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
आणखी वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI