मुंबई : शाळा सुरू करण्याबाबत राज्यातील पालकांची मते जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाचे सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये आतापर्यंतच्या डेटावरून राज्यातील सुमारे 85 टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचे समोर आले आहे. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग 15जुलैपासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. याचसोबत अनेक पालक, शिक्षक इतर वर्ग सुरु करण्याबाबत देखील वारंवार विचारणा करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील  सर्व पालक, शिक्षक यांच्याकडून शाळा सुरु करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. 


या सर्वेक्षणातून आतापर्यंत सकारात्मक आकडेवारी समोर



  • ग्रामीण भागातून 52.48 % पालक -118182

  • निमशहरी भागातून 10.63% पालक - 23948

  • शहरी भागातून 36.89% पालक - 83064

  • याप्रमाणे एकूण 225194 पालकांनी आतापर्यंत आपले मत नोंदविले आहे.

  • यातील शाळेत पाठवायला तयार असणारे 83.97% पालक - 189095

  • शाळेत पाठवायला इच्छुक नसणारे पालक - 16.03% पालक - 36099

  • एकूण 225194 आतापर्यंतची आकडेवारी


सदर सर्वेक्षण सोमवार 12 जुलै रात्री 11.55 पर्यंत सुरु राहणार आहे. राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी यांनी पालकांना सदर सर्वेक्षणात आपले मत नोंदविण्याचे आवाहन करण्याच्या सूचना सुद्धा शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेणे सर्वेक्षण लिंक दिली आहे. http://www.maa.ac.in/survey या लिंकवर जाऊन पालकांनी शाळा सुरू करण्याबाबत अभिप्राय शिक्षण विभागाला कळवायचा आहे.


यामध्ये पालकांना विविध प्रश्न विचारून पालकांचा शाळा सुरू करण्याबाबत म्हणणं समजून घेण्याचा या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट असणार आहे. यामध्ये आपली शाळा कोणत्या भागात येते, तेथील कोविड परिस्थिती, पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यास तयार आहेत का? याबाबतची माहिती सर्वेक्षणामध्ये पालकांकडून घेतली जाणार आहे. एकीकडे कोविड मुक्त गावांमध्ये शाळा 15 जुलैपासून सुरू करण्याची परवानगी शिक्षक विभागाने दिली असताना ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ठरावाने शाळांबाबत निर्णय घेणे अपेक्षित आहे. ग्रामीण भागात सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता यामध्ये पालकांच्या सूचना, अभिप्राय सुद्धा शाळा सुरू करण्याच्या वेळी महत्वचा असणार आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI