उत्तर प्रदेश : तरुणावर जबरदस्तीने लिंगबदल शस्रक्रिया केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधून समोर आली आहे. एका व्यक्तीने डॉक्टरांसोबत मिळून त्याच्या नकळत त्याच्यावर लिंगबदल शस्त्रक्रिया केली, असा आरोप पीडित तरुणाने केला आहे. मंसूरपूर ठाणे हद्दीतील बेगराजपूर मेडिकल कॉलेजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणासह त्याच्या कुटुंबियानी आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. ही बातमी समोर येताच भारतीय किसान मोर्चाने देखील मेडिकल कॉलेज बाहेर आंदोलन कर डॉक्टर आणि संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


तरुणावर जबरदस्तीने लिंगबदल शस्त्रक्रिया


पीडित युवकाने आरोप केला आहे की, आरोपीने तो झोपेत असताना डॉक्टरांसोबत मिळून जबरदस्तीने त्याचं लिंग परिवर्तन केलं. यामुळे सांझक गावातील 20 वर्षीय तरुणाचं आयुष्य उद्धवस्त झालं आहे. आरोपी ओमप्रकाशने 3 जून रोजी डॉक्टरांसोबत साटं-लोटं करुन तरुणावर जबरदस्तीने लिंगबदल शस्रक्रिया केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ओमप्रकाशने डॉक्टरांना तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापयला सांगत त्याच्यावर लिंगबदल शस्त्रक्रिया करवून घेतली. पीडिताने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओमप्रकाशने गेल्या दोन वर्षांपासून तरुणाला आपल्यासोबत ठेवून धमकी देत त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले होते आणि त्यानंतर त्याच्यावर लिंगबदल शस्रक्रिया केली.


'आता तू मुलगी झालास, आपण लग्न करु'


पीडित तरुणाने सांगितलं की, तरुण जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याला सांगण्यात आलं की, आता तू मुलगा नाही, मुलगी झालास. आता आपण लग्न करु शकतो. पीडित तरुणाने आरोप करताना म्हटलं आहे की, ओमप्रकाश याने 3 जून रोजी त्याची फसवणूक केली. ओमप्रकाशने मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांना त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी राजी केलं.


दोन वर्षांपासून तरुणाचं लैंगिक शोषण


पीडित तरुणाला सांगण्यात आलं होतं की, त्याला वैद्यकीय समस्या आहे, ज्यासाठी रुग्णालयात तपासणी करणं आवश्यक आहे. ओमप्रकाशने त्याला बेगराजपूर मेडिकल कॉलेजमध्ये आणलं. जिथे कर्मचाऱ्यांनी त्याला भूल देऊन त्याचं लिंग बदलण्यासाठी ऑपरेशन केलं. गेल्या दोन वर्षांपासून ओमप्रकाश आपल्याला धमकावत होता आणि आपलं शोषण करत होता, असा आरोपही पीडिताने केला आहे. 


लग्न करण्यासाठी तरुणाच्या आयुष्याशी खेळ


सांझक गावातील रहिवासी असलेल्या पीडित तरुणाने पोलिसांना सांगितले की, तो तीन वर्षांपूर्वी भोपा रोडवर असलेल्या पेपर मिलमध्ये कामासाठी गेला होता. येथे त्याची सोराम गावातील रहिवासी फोरमॅन ओमप्रकाश याच्याशी मैत्री झाली. आरोपीने त्याला आपल्या खोलीत बोलावून त्याच्यावर बलात्कार केला. तसेच तंत्र-मंत्र विधी केले. 3 जून रोजी आरोपीने त्याला आमिष दाखवून दोन अनोळखी लोकांसोबत बेदम मारहाण केली आणि तिला मुझफ्फरनगर मेडिकल कॉलेजमध्ये नेले, तेथे त्याने त्याला बाथरूममध्ये नेले आणि त्याच्यावर बलात्कार केला. 6 जून रोजी त्यांनी डॉ. रझा यांना भेटून त्यांचे प्रायव्हेट पार्ट कापले आणि त्याच्यावर लिंगबदल शस्रक्रिया केली. डॉक्टरांनी तरुणाला मुलापासून मुलगी बनवल्याचे सांगितले, असा आरोप पीडित तरुणाने आहे. शुद्धीवर आल्यानंतर तरुणाने कुटुंबीयांना माहिती दिली.