Yavatmal Crime News: यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील लाडखेड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या युवकाच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत उलगडा करत पती-पत्नीला अटक केली आहे. एकतर्फी अनैतिक संबंधातून सुरू झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नेर मार्गावरील लासीना-वाघापूर शेतशिवार परिसरात गॅस गोदामाजवळ 15 मार्च रोजी सकाळी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहावर चाकूने वार केल्याच्या खुणा तसेच दगडाने ठेचल्याचे स्पष्ट दिसत होते. याशिवाय डोळ्यांत तिखट टाकण्यात आल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. तपासादरम्यान मृताची ओळख आतिश सुभाषराव देशमुख (वय 36, रा. गोविंद नगर, यवतमाळ) अशी पटली. याप्रकरणी मृताचे काका पंजाबराव मारोतराव देशमुख यांच्या तक्रारीवरून लाडखेड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Yavatmal Crime News: पती-पत्नीवर संशय बळावला
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाईल कॉल डिटेल्स आणि शेवटच्या संपर्काच्या आधारे तपासाची सूत्रे पुढे नेली. या तपासात अंकुश नागोराव खोडे (वय 43) आणि त्यांची पत्नी रुपाली अंकुश खोडे (वय 38, रा. दांडेकर लेआउट, यवतमाळ) यांच्यावर संशय बळावला.
Yavatmal Crime News: चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली
दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तपासात समोर आले की, मृतक आतिश देशमुख याचे रुपाली खोडे हिच्याशी पूर्वी संबंध होते. मात्र नंतर संबंध तुटल्यानंतरही आतिश तिला वारंवार संपर्क करत होता. तो तिच्यावर पुन्हा संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता, तसेच तिच्या पतीला जिवे मारण्याच्या धमक्या देत होता.
Yavatmal Crime News: दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक
या सततच्या त्रासाला कंटाळून पती-पत्नीने संगनमत करून 14 मार्च रोजी आतिशला वाघापूर शेतशिवारात बोलावले. तेथे त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले आणि दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली. गुन्हा लपवण्यासाठी डोळ्यांत तिखट टाकण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वैयक्तिक वादातून गुन्हेगारीकडे वळण्याच्या प्रवृत्तीबाबत पुन्हा एकदा चिंतेची बाब समोर आली आहे.
आणखी वाचा
