Mumbai: मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या ठाकरवाडी आणि जामरुंग रेल्वे स्टेशनदरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ एका ट्रॉली बॅगमध्ये विच्छिन्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.चालत्या रेल्वेमधून ही सूटकेस खाली फेकली असावी अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगडच्या कर्जत पुणे रेल्वे मार्गावर महिलेचा अस्थाव्यस्थ अवस्थेत मृतदेह आढळला आहे. एका सुटकेसमध्ये बेवारस मृतदेह आढळून आल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण होते. गुलाबी रंगाच्या सुटकेस मध्ये आढळून आलेल्या मृतदेहाची पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. (Mumbai)
नक्की घडले काय?
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9:30 च्या सुमारास रेल्वे अधिकाऱ्यांनी ट्रॅकची तपासणी करत असताना त्यांना रेल्वे रुळांच्या बाजूला ही ट्रॉली बॅग आढळली. बॅग उघडल्यानंतर त्यामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला. यानंतर तात्काळ जीआरपी कंट्रोल, जीआरपी पुण्याचे वरिष्ठ पीआय, कर्जत सिटी पोलीस आणि खोपोली पोलीस यांना याची माहिती देण्यात आली. (Mumbai Crime)
सुमारे 12.40 वाजता कर्जत सिटी पोलीस ठाण्याच्या एपीआय मनीषा आपल्या पथकासह आणि लोनावळा जीआरपी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रॉली बॅग उघडली असता त्यामध्ये लाल टी-शर्ट आणि पांढऱ्या लोअरसह एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्या महिलेचे डोके प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले होते आणि तिचे हातपाय नायलॉनच्या दोऱ्यांनी बांधलेले होते असे पोलिसांनी सांगितले आहे. घटनेची गंभीरता पाहता फॉरेन्सिक पथकासह डॉक्टरांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले आहे..
सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरु
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, जेणेकरून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पोलिसांना संशय आहे की, कदाचित कोणीतरी चालत्या ट्रेनमधून हा ट्रॉली बॅग खाली फेकला असावा. त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या गाड्या जातात, त्या कोणत्या स्टेशनांवर थांबतात, याचा तपास सुरू आहे. त्या त्या स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत, जेणेकरून ही बॅग घेऊन रेल्वे परिसरात कोण आलं होतं हे समजू शकेल. गेल्या काही दिवसांपासून पाेलीस हरवलेल्या महिलांची माहितीही गोळा करत आहेत. मृत महिलेच्या वर्णनाशी जुळणाऱ्या मिसिंग महिलांवर पोलिसांचं लक्ष आहे. सद्यस्थितीत पोलिस मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत असून तपास सुरू आहे.
हेही वाचा: