(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime: पती आणि दीर निघाले मारेकरी! महिलेचा शिरच्छेद केलेल्या हत्याकांडाची उकल
Mumbai News: समुद्रकिनारी एका प्रवासी बॅगेत महिलेचा शीरविरहित मृतदेह सापडल्याच्या प्रकरणाचे गूढ पोलिसांनी उकलले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि दीराला अटक केली आहे.
Mumbai News: मीरा-भाईंदर परिसरातील उत्तन समुद्रकिनारी शुक्रवारी (2 जून) एका महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. शीर नसलेलं धड समुद्रकिनाऱ्यावर पडलेल्या एका बॅगेत मिळाल्याने परिसरात भीती निर्माण झाली होती. पोलिसांना माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. याप्रकरणी उत्तन सागरी पोलिसांनी अवघ्या 24 तासात या प्रकरणाचा छडा लावला आहे.
पीडित महिलेची ओळख पटली असून मृत महिला नायगाव येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी यश मिळवलं आहे. चारित्र्याच्या संशयावरुन पतीनेच आपल्या पत्नीची गळा चिरुन हत्या केल्याचं यात उघड झालं आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीच्या भावाने देखील मदत केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
मयत अंजली सिंग असं 23 वर्षीय हत्या झालेल्या महिलेचं नाव असून ती नालासोपाऱ्याच्या राजीवली येथील राज एमरल्ड या इमारतीत आपला पती मिंटू सिंग, दिर चुनचुन सिंग आणि आपल्या लहानग्या बाळासह राहत होती. दीड महिन्यापूर्वी त्यांनी या सोसायटीमध्ये भाड्याने घर घेतलं होतं. मयत अंजलीचं तीन वर्षांपूर्वीच बिहारमध्ये मिंटू सिंग याच्यासोबत लग्न झालं होतं. या दोघांना दोन वर्षांचा मुलगा देखील आहे. कामानिमित्त तिचा पती मुंबईला आला आणि नालासोपारा येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करु लागला.
अंजली सिंग ही मयत महिला खुल्या विचारांची होती आणि समाज माध्यमांवर (Social Media) सक्रीय देखील होती. त्याच बरोबर ती कॅटरीगचं कामही करायची, त्यामुळे ती काही वेळा 10 ते 15 दिवस घराबाहेर असायची. त्यामुळेच मिंटू सिंग याला तिच्या चारित्र्याबद्दल नेहमी संशय निर्माण होत होता आणि यामुळेच त्या दोघांमध्ये सतत वाद देखील सुरु होते.
मिंटू सिंग याने अशाच एका वादातून 24 मे रोजी संध्याकाळी अंजलीचे शीर कोयत्याने कापले आणि तिच्या मृत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी धडाचे दोन तुकडे करून ते सुटकेसमध्ये भरले. 25 जून रोजी रात्री 12.30 वाजता इमारतीतून मिंटू याने बॅगेत भरलेले अंजलीचे धड स्कुटीवरुन घेवून जावून, आपला भाऊ चुनचुन सिंग याच्या मदतीने ही सुटकेस भाईंदरच्या खाडीतून फेकून दिली होती. मात्र 2 जूनला अंजलीचा मृतदेह उत्तनच्या समुद्रकिनारी लागला आणि मिंटू सिंगचं बिंग फुटलं.
आरोपी मिंटू सिंगने या सात दिवसांत आपल्या लहान मुलाला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी हैदराबाद आणि त्यानंतर नेपाळ असा प्रवास केला होता. यात मुलाला सासऱ्याच्या ताब्यात दिल्यानंतर तो नालासोपाऱ्याला राहत असलेल्या ठिकाणी आपल्या पत्नीचे दागिने घेऊन पळ काढत असतानाच दादर रेल्वे स्थानकावर त्याला अटक करण्यात आली. सोसायटीतील लोकांना त्याने आपल्या बायकोला साथीचा रोग आल्यामुळे तिला गावी पाठवल्याचं सांगितलं.
पोलिसांना या गुन्ह्याची उकल प्रामुख्याने टॅटूच्या मदतीने झाली. सुटकेसमधील मृतदेहाच्या शरीरावर टॅटू होता, तसेच तिला बांधण्यासाठी वापरलेल्या प्लास्टिक पिशवीवर नायगाव येथील पत्ता होता. त्यामुळे ही महिला नायगाव येथे राहत असल्याचा प्रथम संशय पोलिसांना आला होता. त्यानंतर नायगाव येथील टॅटू काढणाऱ्याशी चर्चा केल्यानंतर हे टॅटू तिथेच काढलं असल्याचं स्पष्ट झालं. यात या महिलेने टॅटू उधारीवर काढला असल्यामुळे ती टॅटू काढणाऱ्याच्या संपर्कात होती. शिवाय टॅटू काढतानाचा व्हिडीओ महिलेने समाज माध्यमांवर (Social Media) टाकल्याने तिची ओळख पटवून घेण्यात पोलिसांना मोठी मदत झाली.
हेही वाचा: