Washim News Update : वाशीम जिल्ह्यातील एरंडा - बोराळा  गावातील जुन्या राजकीय वादातून उपसरपंचाचं अपहरण करून  हत्या  केल्याची घटना समोर आली आहे. विश्वास  कांबळे  असे हत्या झालेल्या उपसरपंचांचे नाव आहे.  मृत कांबळे यांच्यासोबत या पूर्वीही गावातील राजकीय लोकांचे वाद झाले होते. त्यांनी यातील काही लोकांच्या विरोधात पोलिसात तक्रारी देखील दिल्या होत्या. मात्र काल राजाकिन्ही येथे विश्वास कांबळे उपचारासाठी गेले असता अज्ञात लोकांनी चारचाकी वाहनातून त्यांचे अपहरण केले. 


कांबळे यांच्या अपहरणाचे वृत्त  कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी राजाकिन्ही गावापासून 12 किलोमीटर अंतरावर गुंज फाट्याजवळ विश्वास कांबळे जखमी अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी तात्काळ आपल्या वाहनातून विश्वास  कांबळे यांना वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांणा मृत घोषित केले. या घटनेनंतर कांबळे यांच्या पत्नीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. आणखी दोन जणांनाचा  शोध सुरू आहे.  नामदेव वानखडे, रामचंद्र वानखडे , श्यामसुंदर  वानखडे आणि केशव वानखडे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. 


संधी साधत केले अपहरण 


शनिवारी दुपारी विश्वास कांबळे त्यांच्या पत्नीच्या उचारासाठी राजाकिन्ही गावात गेले होते. यावेळी त्यांची पत्नी बाथरुमसाठी गाडीतून गेल्याची संधी साधत नामदेव वानखडे, रामचंद्र वानखडे, श्यामसुंदर वानखडे, केशव  वानखडे आणि इतर दोघे जण विश्वास कांबळे यांना  गाडीत ( क्रमांक ,  MH 47 N 0439 ) घालून घेऊन गेले. या घटनेनंतर काही स्थानिक नागरिकांनी आणि कांबळे यंच्या पत्नीने ताबडतोब पोलिसात अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. 


जुन्या वादातून हत्या


बोराळा ग्रामपंचायत निवडणुकीत वानखडे कुटुंबीयांचा पराभव करून विश्वास कांबळे हे गावचे उपसरपंच झाले होते. मात्र, निवडणुकीमध्ये  झालेला पराभव वानखडे कुटंबाच्या जिव्हारी लागला असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान, सध्या विश्वास कांबळे यांचे शवविच्छेदन  सुरु असून या प्रकरणी  पोलिसांनी आरोपींना गुन्हा दाखल करून अटक केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर हत्येबाबत माहिती मिळेल अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत.  


ग्रामपंचायत निवडणुकीवरून गावात अनेक वाद


बोराळा हे 1400  लोकसंख्या असलेलं गाव आहे. या गावात ग्रामपंचायत निवडणुकीतून अनेक वेळा वाद झाले. अनेकवेळा हाणामारी होऊन वाद पोलिस स्टेशनपर्यंत सुद्धा पोहोचले. वानखडे कुटुंबीयांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून त्यांच्यावर विनयभंगाचे गुन्हे देखील दाखल मृत कांबळे यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.