Washim Crime News : आज वाशिम जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या घरातून 17 लाख 30 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तर दुसऱ्या घटनेत गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने बसमध्ये चढत असताना लहान मुलाच्या हातातील कडे चोरण्याचा प्रयत्न केला. पण महिलांच्या लक्षात येताच तिथेच दोन महिलांनी चोरट्याला चोप दिला आहे.
वाशिमच्या कारंजा शहरात धाडसी चोरी, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या घरातून 17 लाख 30 हजारांचा ऐवज लंपास
वाशिमच्या कारंजा शहरात धाडसी चोरीची घटना समोर आली आहे. मेमन कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक जमील रहीम शेख यांच्या घरावर डल्ला मारत तब्बल 17 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केलाय.. चोरट्यांनी घराची कडी तोडून आत प्रवेश करत कपाटातील लॉकर फोडले आणि सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम चोरुन नेली आहे. घरातील सदस्य शेजारच्या खोलीत झोपेत असतानाच ही चोरी झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.
लहान मुलाच्या हातातील कडे चोरण्याचा प्रयत्न फसला, चोरट्याला महिलांनी दिला चोप
सध्या लग्नसराई आणि सुट्ट्यांमुळे बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. याच गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने बसमध्ये चढत असताना लहान मुलाच्या हातातील कडे चोरण्याचा प्रयत्न करत होता. ही घटना महिलांच्या लक्षात येताच तिथेच दोन महिलांनी चोरट्याला चोप दिला. हा सर्व प्रकार वाशिमच्या मंगरुळपीर बस स्थानकावर घडला आहे. महिलांनी चोरट्याला झोप देताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान नागरिकांनी तात्काळ चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. गर्दीच्या वेळेस बस स्थानकावर पोलीस असणे गरजेचे असते. मात्र, यावेळी कोणताही पोलीस कर्मचारी बस स्थानकावर हजर नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.