Wardha News Update : मजुरीचे पैसे मागितल्याच्या रागातून हॉटेल मालकाने मजुराची निर्घृण हत्या केली आहे. वर्धा शहरा नजीकच्या यवतमाळ नागपूर हायवे रोडवर पिपरी मेघे परिसरातील जुनापाणी चौकात ही घटना घडली असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. अमोल पद्माकर मसराम ( वय, 32 रा. कारला चौक पिपरी वर्धा ) असे हत्या झालेल्या मजुराचे नाव आहे. तर महेश उर्फ मॅटर मसराम (31 रा. पिपरी मेघे, वर्धा ) असं संशयित हॉटेल मालकाचे नाव आहे.
वारंवार मजुरीचे पैसे मागितल्यावरून हॉटेल महेश याने संतापून अमोर याच्या गळ्यावर, हातावर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यामुळे अमोल जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मृत अमोल हा महेश याच्या हॉटेलमध्ये मजूर म्हणून काम करत होता आणि तिथेच राहत होता. आरोपी हॉटेल मालक महेश हा अमोल याला मजुरीचे पैसे देत नव्हता. त्यामुळे त्यांचे नेहमी वाद होत होते, महेश याने मजुरीच्या पैशावरून अमोल याला जीवे मारण्याची धमकी देत होता. याबाबत अमोल मसराम याने दोन दिवसांपूर्वी त्याच्या मावस भावाला याबाबत सांगितलं होतं. त्यावेळी त्याच्या भावाने त्याला "महेशला तुझे पैसे दयायला सांगतो" असे म्हणून समजाविले होते.
अमोल याला पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्याने महेश याच्याकडे पैसे मागितेल. परंतु, यातूनच त्याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर वर्ध्यातील जुना पाणी चौकात नागपूर यवतमाळ रिंग रोड हायवेवर अमोलची हत्या झाली असल्याची माहिती फोनवरून त्याच्या मावस भावाला मिळाली. त्यावरून नेमकं काय झालंय ते बघण्यासाठी तो तातडीने नातेवाईकांसह घटनास्थळी गेला. त्यावेळी त्याला अमोल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा दिसला. त्याच्या गळ्यावर, चेहऱ्यावर आणि हातांवर धारदार हत्याराने वार केल्याची खोल जखम होती, रस्त्यावर रक्त सांडले होते. हे धक्कादायक चित्र पाहून अमोलच्या भावाने तो काम करत असलेल्या हॉटेल मालकाकडे चौकशी केली. यावेळी हॉटेल मालक महेश तिथे नव्हता. त्यामुळे नातेवाईकांना संशय आला.
संशयावरून अमोल याचा मावस भाऊ आकाश इरपाते याने रामनगर पोलीस ठाण्यात हॉटेल मालक महेश याने अमोलची हत्या केल्याचा संशय असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर रामनगर पोलिसांनी हॉटेल मालक महेश मसराम याला ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास रामनगर पोलिसांकडून सुरू आहे. सध्या वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून हत्या आणि इतर गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते, त्यात आज घडलेल्या या धक्कादायक घटनेने आणखीनच भर पडलीय.