Vasai Virar Latest Marathi News Update : नालासोपाऱ्यात एका तरुणाने आपल्या रूम पार्टनरचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह बेडच्या आत टाकून फरार झाल्याची घटना सोमवारी घडली होती. त्यात आता नवीन खुलासा झाला आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकर मृतदेहासोबत 24 तास राहिला होता, अशी सनसनीखेज माहिती समोर आली आहे. आरोपीचं नाव हार्दिक शाह असे आहे. तो कामधंदा करत नव्हता, प्रेयसीच्या पैशावर ऐशोआरामात राहत होता. तरुणीच्या कामाच्या तगाद्याला कंटाळून तरुणाने प्रेयसीची हत्या केली. प्रेयसीने सुखी संसारासाठी जमा केलेली रक्कम आणि घरातील सामान त्या तरुणाने विकले अन् फरार झाला होता. मात्र, वसई क्राईम युनीट 3 च्या पथकाने त्याला राजस्थान आर.पी.एफ.च्या मदतीने नागदा जंक्शन येथून मंगळवारी 14 फेब्रुवारीला आरोपीला अटक केली होती. वसई न्यायालयाने आरोपीला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  


हार्दिक शाह आणि मेघा तोरबी यांचे मागील तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्यांनी तीन महिन्यापूर्वी नालासोपारा पूर्वेकडील तुळींजच्या सीता सदन या इमारतीमध्ये भाड्याने रुम घेतली होती. तिथे ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.  हार्दिक बेरोजगार होता. तर मेघा एका हॉस्पीटलमध्ये नर्स म्हणून काम करायची. हार्दिक बेरोजगार असल्याने मेघा हार्दिककडे नेहमी कामाचा दगादा लावयची. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. सततच्या भांडणाला वैतागून हार्दिकने टोकाचं पाऊल उचललं. 12 फेब्रुवारीला हार्दिकने प्रेयसीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह घरच्या बेडमध्ये लपवून ठेवला होता. इतकेच नाही तर, रात्रभर प्रेयसीच्या मृतदेहासोबत राहिला. ज्या बेडच्या आतमध्ये प्रेयसीचा मतदेह ठेवला होता, त्याच बेडवर तो झोपला होता. 


दुसऱ्या दिवशी प्रेयसीनं सुखी संसारासाठी घरात आणलेलं टिव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, भांडी-कुंडी घरातील सर्व उपयोगी सामान विकून टाकलं. त्यासोबत पैसेही घेतले अन् फरार झाला. हार्दिकने फक्त बेड विकला नाही. कारण बेडच्या आत प्रेयसीचा मृतदेह होता. सर्व सामान विकून आरोपी हार्दिकने मयत प्रेयसीची चुलत बहिणीला व्हॉटसअॅप वर मेसेज करुन, मेघा आपल्यात राहिली नसून, मेघाचे इतराबरोबर अफेअर होते. माझं जीवन बिघडून टाकलं. मेघाची बॉडी हवी असल्यास अॅड्रेस पाठवतो आणि तेथील एका इस्टेट एंजन्टचा फोन नंबर पाठवत आहे. मी जीव द्यायला जात असल्याचं  मॅसेजमध्ये सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर त्याने ट्रेन पकडून मध्यप्रदेशात जाण्यास निघाला. तोपर्यंत मेघाच्या हत्येची माहिती पोलिसांनी समजली होती. वसईच्या क्राईम युनिट 3 ने आरोपी हार्दिकचा मागोवा काढून, राजस्थान आर.पी.एफ.च्या मदतीने नागदा जंक्शन येथून आरोपीला ताब्यात घेतलं. सध्या वसई न्यायालयान हार्दिक शाहला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.