Vasai Crime News वसई: नालासोपारा पश्चिम परिसरात एका महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं? (Vasai Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला वसई पश्चिम येथील एका हॉटेलमधून आपल्या राहत्या घरी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिचा पाठलाग केला. त्यानंतर आरोपी महिलेच्या इमारतीपर्यंत पोहोचला. इमारतीच्या परिसरात आरोपीने महिलेच्या फ्रॅाकमध्ये खालून हात घालत, महिलेचा विनयभंग करत तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे.
अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल- (Vasai Crime News)
सदर घटनेनंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 75 आणि 78 अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपीने फिकट गुलाबी रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची जीन्स आणि पायात सँडल घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
वसईतील आणखी एक धक्कादायक घटना- (Vasai Crime News)
प्रेयसीच्या आई-वडिलांनी लग्नाला नकार दिल्याने नैराश्यात गेलेल्या एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना वसई रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर घडली. मात्र माणिकपूर पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचा जीव वाचला असून त्यांच्या या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ही घटना 5 जून रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण लग्नास नकार मिळाल्यामुळे मानसिक तणावाखाली होता. नैराश्यातून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेत स्कायवॉकच्या दिशेने धाव घेतली. त्याच्या मित्रांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर त्याने स्कायवॉकच्या कठड्यावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला.
परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच मित्रांनी तातडीने माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन मदतीची विनंती केली. यानंतर पोलीस ठाण्यातील एक वरिष्ठ अधिकारी आणि दोन पोलीस अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अत्यंत शांतपणे आणि संयमाने तरुणाशी संवाद साधत त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. दरम्यान, एका पोलीस अंमलदाराने मागून जाऊन योग्य संधी साधत त्याला मिठी मारून सुरक्षितपणे कठड्यावरून खाली आणले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर तरुणाला माणिकपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्या आई-वडिलांना बोलावून त्याचे समुपदेशन करण्यात आले आणि त्याला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. माणिकपूर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परता, संयम आणि धाडसामुळे एका तरुणाचा जीव वाचला असून त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
