Vaishnavi Hagawane Death: पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांची सून वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane Death) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीचा बडतर्फ तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेच्या सुनेने आत्महत्या केल्यावर आता 9 महिन्यांच्या बाळावरून वाद पेटला आहे. वैष्णवीचं बाळ तिचा नवरा शशांकने त्याचा मित्र निलेश चव्हाणकडे दिल्याचा आरोप कस्पटे कुटुंबाने केलाय. मात्र बाळ ताब्यात देण्यास नकार दिला जातोय. वैष्णवीचे काका आजही बाळ ताब्यात घेण्यासाठी चव्हाण कुटुंबाकडे गेले, मात्र त्यांना दारच उघडलं गेलं नाही. बाळ आत आहे की नाही याचीही आता त्यांना खात्री राहिलेली नाही.
वैष्णवी हगवणे प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील महत्वाचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात इतर कारवाई होत असताना तिचे 9 महिन्यांचे अपत्य कुठे आहे, याचा तातडीने शोध घ्या आणि ते तिच्या आईकडे सुपूर्द करा, अशी सूचना देवेंद्र फडणवीसांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिली आहे. तसेच या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे सुद्धा निर्देश दिले आहेत.
अजित पवारांचेही महिला कार्यकर्त्यांना निर्देश-
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या दोन महिला नेत्यांना बाळ कस्पटेंकडे सोपवण्याच्या सुचना केल्या आहेत. वैशाली नागवडे आणि रुपाली पाटील यांना कस्पटेंच्या घरी जाऊन बाळ सोडवायला सांगितले आहे.
वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे काय म्हणाले?
वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबीयांकडे असणारं बाळ पुण्यातील बंदूकधारी निलेश चव्हाणकडे होते. मात्र आता तिथून बाळ गायब झालं, मग नेमकं कुठं गेलं. असा प्रश्न वैष्णवीच्या वडिलांनी उपस्थित केला. आता बाळ हगवणेंच्या नातेवाईकांकडे दिलंय असं बोललं जात असलं तरी बाळ चव्हाणकडे आहे, असा आमचा संशय आहे. बाळ आमच्याकडे देण्यासाठी प्रशासन काहीचं प्रयत्न करेना, अशी खंत ही वैष्णवीच्या वडिलांनी व्यक्त केली. वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सासरे राजेंद्र हगवणे आणि पती शशांक हगवणेंची राष्ट्रवादीने हकालपट्टी केलीये, पण एवढं करुन चालणार नाही. तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा. अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केलीये. राज्य महिला आयोग पदी ही अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर आहेत, त्यांनी जे वक्तव्य दिलं ते योग्य आहे. पण त्यांनी अद्याप आम्हाला एकदा ही संपर्क साधला नाही. किंबहुना अजित पवार गटाकडून कोणीही आमचं सांत्वन करायला आलं नाही, अशी खंत वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी व्यक्ती केली.
राज्य महिला आयोगाने काय म्हटलंय?
पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेची दिनांक 19 मे 2025 रोजी स्वाधिकारे दखल घेत राज्य महिला आयोगाने पुणे पोलीसांनी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. वैष्णवी हगवणे यांच्या बाळाचा ताबा आज वैष्णवीच्या आई वडिलांकडे देण्यात येईल. हगवणे कुटुंबातील 3 आरोपी अटक आणि 2 फरार असताना वैष्णवी यांचे 10 महिन्यांचे बाळ राजेंद्र हगवणे यांच्या मावस भावाकडे होते. आज कायदेशीर मार्गाने जात सर्व प्रक्रिया पूर्ण करून या बाळाचा ताबा वैष्णवी यांच्या आई वडिलांकडे देण्यात येणार आहे, असं राज्य महिला आयोगाकडून सांगण्यात आले आहे.