ठाणे : उल्हासनगरमध्ये महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगाराची भरदिवसा ऑन ड्युटी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महादू जगताप असे मयत सफाई कर्मचाऱ्याचे नाव असून तो उल्हासनगर महापालिकेने ठेका दिलेल्या कोणार्क कंपनीकडे कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करत होता. या घटनेनंतर आणखी एक दुर्दैवी घटना घडली. पतीच्या हत्येची माहिती मिळताच त्यांची पत्नी पूर्वी महादू जगताप यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या दुहेरी घटनेमुळे उल्हासनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ऑन ड्युटी असताना हल्ला
महादू जगताप हे आज सकाळी उल्हासनगर कॅम्प 3 मधील सेक्शन 20 परिसरात आनंद आईस्क्रीमजवळ साफसफाईचे काम करत होते. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात महादू जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
घटना सीसीटीव्हीत कैद
सदर हल्ल्याची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
भरदिवसा काम करत असताना सफाई कर्मचाऱ्याची हत्या झाल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या घटनेनंतर महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
जळगावात पोलिसाची आत्महत्या
जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगाव (Jalgaon) तालुक्यातील कोदगाव येथे गळफास घेऊन जीवन संपवलं, या घटनेनं पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. निलेश पाटील असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव कोदगाव येथील घरातच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली असून आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पोलिसांच्या तपासाला अधिक गती येईल. तसेच, कुटुंबीय आणि नातेवाईकांकडेही विचारपूस केली जात असल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा :