Ulhasnagar Robbery: घरकाम करणाऱ्या महिलेनंच तब्बल 91 तोळे सोनं चोरून पोबारा केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर क्राईम ब्रँचनं जंग जंग पछाडत अखेर महिनाभरानंतर या महिलेला अटक केलीय. संबंधित महिलेवर अशाच पद्धतीनं चोरी केल्याचं 12 गुन्हे दाखल असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय. 


उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे व्यापारी राम तनवाणी यांच्या घरी महिनाभरापूर्वी ही चोरी झाली होती. तनवाणी यांच्या घरी एक महिला कामाची गरज असल्याचं सांगत घरकाम मागण्यासाठी आली. या महिलेला तनवाणी यांनी कामावर ठेवून घेतलं, मात्र या महिलेनं तनवाणी यांच्या घराची चावी चोरून नेली. तनवाणी हे काही कामानिमित्त परिवारासह बाहेर गेलेले असताना या महिलेनं घरात प्रवेश करत घरातलं तब्बल 91 तोळे सोनं चोरून नेलं. तनवाणी हे घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. सुदैवानं तनवाणी यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता. ज्यात ही महिला चोरी करताना कैद झाली. त्याआधारे पोलिसात तक्रार करण्यात आल्यानंतर उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत महिलेचा शोध सुरू केला.


दुसरीकडे उल्हासनगर क्राईम ब्रँचनं सुद्धा या महिलेचा माग काढणं सुरू केलं. या महिलेनं तिचं नाव आशा इतकंच सांगितलं होतं. तसंच ही महिला मुलुंडची राहणारी असल्याचं पोलिसांना समजलं. त्याआधारे तिचा शोध सुरू केला असता ती उत्तर प्रदेशातील बुलंद शहर, अहमदाबाद, नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याचं पोलिसांना आढळून आलं. अखेर ती मुलुंडला येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिला बेड्या ठोकल्या. तपासात तिचं नाव आशा नसून नर्मदा खान असल्याचं समोर आलं. तिच्याकडून पोलिसांनी 25 तोळे सोनं हस्तगत केलं आहे. दरम्यान, नर्मदा खान हिच्यावर यापूर्वीचं अशाच पद्धतीने चोरी केल्याचे तब्बल 12 गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय. या गुन्ह्यात महेश शिंदे नावाच्या आणखी एका साथीदाराने या महिलेची मदत केल्याचं समोर आलं असून त्याचा सध्या शोध सुरू असल्याची माहिती उल्हासनगर क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha