Palghar News : पालघर तालुक्यातील गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील दोन तरुणांचा वांद्री धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. होळीच्या निमित्ताने सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वांद्री दोघेही धरण परिसरात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. धरणाच्या पाण्यात पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाल्याने दोघांचा मृत्यू झाला. स्वप्निल विजय मस्के (वय 27) आणि अजय पांडुरंग साळवे (वय 26) अशी मयत तरुणांची नावे असून दोघेही मुंबईचे रहिवासी होते. धुळवडीच्या दिवशी पाण्यात बुडून तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना राज्यात इतरत्रही घडली. त्यामुळे सणाला गालबोट लागले. 


मुंबईच्या मालाड आणि कांदिवली भागातील मालवणी परिसरातील स्वप्नील म्हस्के आणि अजय साळवे मंगळवारी दुपारी मुंबई वरून मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरण परिसरात पर्यटनाच्या निमित्ताने आले होते. धरण परिसरात फिरत असताना वांद्री धरणाच्या पाण्यात पोहण्याचा मोह त्यांना आवरला नाही. त्यामुळे दोघेही पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. पाण्यात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला.


दोघेही बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. मंगळवारी सायंकाळी उशिरा एक मृतदेह हाती लागला होता. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गांजे गावच्या ग्रामस्थांनी एकत्र येत धरणाच्या पाण्यात उतरून बुडालेला मृतदेह शोधून काढला. पंचनामा करून दोन्ही मृतदेह मनोर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात हे मृतदेह पाठवण्यात आले.


उमरोळीमध्येदेखील एकाचा मृत्यू


गुजरातमधील अहमदाबाद येथील होळीच्या सुट्टी निमित्त पालघर मधील उमरोळी येथे आलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रदीप बलदेव सिंग परमार अस 25 वर्षीय तरुणाचे नाव असून तो उमरोळीतील पारसनाथ येथे एका नातेवाईकाकडे होळी सण साजरा करण्यासाठी आला होता. मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या प्रदीप सिंग परमार याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असून स्थानिक पोलिसांनी अग्निशमन दलाला त्याचा मृतदेह शोधण्यात यश आला आहे. 


मावळमध्ये एकाचा मृत्यू


मावळमध्ये धुळवड खेळून रंग धुण्यासाठी गेलेल्या एकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी घडली. जयदीप पाटील असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. सात ते आठ जणांचा ग्रुप धुळवड खेळून झाल्यानंतर रंग धुण्यासाठी मावळ मधील वराळे गावामधील इंद्रायणी नदी परिसरात गेले होते. त्यावेळी मयत जयदीप आणि त्याचे काही मित्र रंग धुण्यासाठी पाण्यात उतरेल असता नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने जयदीप पाटील यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. वराळेमधील डॉ डी.वाय. पाटील महाविद्यालयात हे सर्व विद्यार्थी शिक्षण घेत होते तर मयत विद्यार्थी जयदीप पाटील हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील तारखेड गावातील रहिवासी आहे.