सांगली : आयपीएलमधील राजस्थान  आणि पंजाब यांच्या दरम्यान सुरू असलेल्या सामन्यात सट्टा घेताना सांगलीत दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.  अटक करण्यात आलेल्या संशयितामध्ये चेतन गुजर आणि इम्रान दानवडे  या तरुणांचा समावेश आहे. या दोघांकडून चार मोबाईल आणि रोख रक्कम असा 58 हजार 855 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.    


 सांगली एस.टी स्टँडजवळील सुखरूप लॉजमधील एका रूममध्ये दोघेजण मोबाईलवरून आयपीएलच्या मॅचवर सट्टा घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला प्राप्त झाली. त्यानंतर तात्काळ याठिकाणी या पथकाने छापा टाकून चेतन माणीकराव गुजर (रा. शाहू उद्यानजवळ सांगली) आणि इम्रान अस्लम दानवडे (रा. शंभर फुटी रोड नुराणी मस्जिदजवळ सांगली) हे दोघेजण विविध मोबाईलचा वापर करून आपल्या वहीमध्ये त्याची नोंद करून घेत असल्याचे आढळून आले.  त्यावेळी त्यांच्याकडून माहिती घेतली असता ते आयपीएलमधील राजस्थान आणि पंजाब यांच्या सामन्यावर सट्टा घेत असल्याचे त्यांनी कबुली दिली आहे.


त्यांच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अभिजीत सावंत यांच्या पथकाने केली.